कुपोषणाबाबत ६२ टक्के पालक अनभिज्ञ!

By admin | Published: November 4, 2015 04:08 AM2015-11-04T04:08:26+5:302015-11-04T04:08:26+5:30

कुपोषणाची समस्या ही केवळ मेळघाट किंवा चंद्रपूर येथे नसून हा धोका आता मुंबईतील झोपडपट्ट्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतील तब्बल ६२ टक्के पालकांना आपली मुले

62 percent of parents are unaware of malnutrition! | कुपोषणाबाबत ६२ टक्के पालक अनभिज्ञ!

कुपोषणाबाबत ६२ टक्के पालक अनभिज्ञ!

Next

मुंबई : कुपोषणाची समस्या ही केवळ मेळघाट किंवा चंद्रपूर येथे नसून हा धोका आता मुंबईतील झोपडपट्ट्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतील तब्बल ६२ टक्के पालकांना आपली मुले ही कुपोषणग्रस्त आहेत, याचीही माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘क्राय’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
‘क्राय’ संस्थेने मुंबईसह दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता येथील झोपडपट्टीत ० ते ६ वयोगटातील १ हजार २६० बालकांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी मुंबईतील २४४ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात मुंबईसारख्या शहरातही कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले आहे. ० ते ६ वयोगटातील बालकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पोषण आणि लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पण, मुंबईत लसीकरणाचे प्रमाण आश्चर्यकारकरीत्या कमी आहे. त्यातच मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जात असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ३ वर्षांखालील ४९ टक्के मुलांनाच लसीकरण करण्यात आले आहे. त्यातही मुलींना लस देण्याचे प्रमाण ४५.३ टक्के तर मुलांना लस देण्याचे प्रमाण ५१.४ टक्के इतके आहे.
यात ७० टक्के मुलांच्या वाढीवर देखरेख ठेवण्यात आली. तरीही ४८ टक्के पालकांनाच त्यांच्या मुलांच्या स्थितीबाबत माहिती होती. मुंबईत ६२ टक्के पालक अनभिज्ञच असल्याचे स्पष्ट झाले. आरोग्यसेवा आणि समाजातील दरीमुळे कुपोषणाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ० ते ६ वयोगटातील बालकांच्या विकासासासठी एकत्रितपणे विचार होण्याची आवश्यकता आहे. यासाठी अंगणवाडी, आयसीडीएस योजना आणि सहायक परिचारिका यांच्या कामाची रूपरेषा ठरवली पाहिजे. आणि सर्व योजनांमध्ये या वयोगटातील मुलांचा एकाच पद्धतीने विचार केला गेला पाहिजे, असे ‘क्राय’ने स्पष्ट केले.
मुंबईत येथील सुमारे ५६ टक्के बालके ही सॅम (सिव्हीयर अ‍ॅक्यूट मालन्यूट्रिशन) गटात मोडणारी आहेत. या मुलांना तत्काळ मदतीची आवश्यकता आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी यांच्यापर्यंत योजना पोहोचण्याची आवश्यकता आहे. मुंबईत मुंबईत ६७.९ टक्के जन्मनोंदणी करण्यात आली आहे. तर अंगणवाडी केंद्रात नोंदणी झालेल्या झोपडपट्टीतील बालकांची टक्केवारी ६२ इतकी आहे. (प्रतिनिधी)

आरोग्य, पोषण आणि काळजी याबाबी बालकांसाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे मुलांना या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. शहरी झोपडपट्ट्यांमध्ये बालकांच्या दोन्ही पालकांना पैसे कमवण्यासाठी काम करणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरासारखी पर्यायी व्यवस्था असली पाहिजे. पहिल्या सहा वर्षांत मुलाची बौद्धिक, शारीरिक आणि सामाजिक-भावनिक वाढ होत असते. याच वयात मुलाच्या भाषेचा, व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. या कालावधीत त्याला योग्य पोषण मिळाले नाही, तर त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर आणि पर्यायाने शिक्षणावर होतो. याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
- क्रिआन रबाडी, पश्चिम प्रादेशिक संचालक, क्राय

Web Title: 62 percent of parents are unaware of malnutrition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.