मुंबई : पेडर रोड येथील जसलोक रुग्णालयात शुक्रवारी ६२ वर्षांच्या महिलेचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दोन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. या अवयवदानातून दोन किडन्या दाना केल्या गेल्या आहेत. हे मुंबई शहरातील या वर्षातील तेरावे अवयव दान आहे.
राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.