Join us

गोव्यात बनलेल्या बनावटीच्या विदेशी दारूचे ६२५ खोके ट्रकसह जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:05 AM

मुंबई : गोव्यात तयार केलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले आहेत. ...

मुंबई : गोव्यात तयार केलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले आहेत. विक्रीसाठी आणलेल्या या दारूसह वाहून नेणारा ट्रक असा एकूण ६७ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल भरारी पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाणपुलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

देशी-विदेशी मद्याची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने गोवा राज्यातील दारूविरोधात केलेली या महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाणपुलाखालून अवैधरीत्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोव्यात तयार केलेल्या आणि विक्रीसाठी आणलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचे ६३५ खोके असलेला ट्रक पकडला. ब्लेंडर्स प्राईड, रॉयल चॅलेंजर्स, अरोबेला व्होडका, इम्पिरियल ब्लू व्हिस्की या ब्रॅंडच्या ७५० मिलीलीटर वजनाच्या बाटल्यांचे ५२५ खोके तर बडवायझर बीअरचे अर्धा लीटर वजनाच्या टीनचे १०० खोके असे एकूण ६२५ खोके ट्रकसह भरारी पथकाने जप्त केले आहेत. ट्रकसह या मद्याची एकूण किंमत ६७ लाख ५७ हजार ७४० रुपये असून, या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.

सहा दिवसांपूर्वीच विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोव्यातील अवैध मद्याचे ५६ लाख ५० हजार रुपये किमतीचे ५०० खोके तर २० मे रोजी उस्मानाबाद येथेही ४३ लाख ९३ हजार रुपये किमतीच्या अवैध मद्याच्या ५७५ खोक्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे.