Join us

'भारतातील ६.२५ लाख मुलं दररोज धूम्रपान करतात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 4:15 PM

धूम्रपानामुळे देशाचे १,८१,८६९ कोटी रुपयांचे नुकसान होते.

मुंबई :-  भारतात ६.२५ लाख मुले दररोज धूम्रपान करतात, असे टोबॅको अॅटलासने केलेल्या सर्वेक्षणाअंती जाहीर झालेल्या अहवालात समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तंबाखू व सिगारेट सर्वत्र सहजपणे व स्वस्त उपलब्ध होत असतात. आपल्या देशात तर सिगारेट सुट्या स्वरुपातही विकल्या जातात. धूम्रपानामुळे देशाचे १,८१,८६९ कोटी रुपयांचे नुकसान होते. यात आरोग्य सुधारण्यावर झालेला थेट खर्च आणि उत्पादकता कमी झाल्यामुळे होणारा अप्रत्यक्ष खर्च यांचा समावेश आहे. वरील आकडेवारी पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, की आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत धूम्रपानामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगभरात सर्वत्र ३१ मे जागतिक तंबाखूविरोधी दिवस पाळला जात आहे. या दिवशी तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. जगभरात तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी ७० लाख जणांचा मृत्यू होतो. यातील १० लाख जण विकसनशील देशांतील असतात. भारतात दर सहा सेकंदांनी एकजण तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या रोगांना बळी पडतो. प्रौढांच्या तंबाखूसेवनाविषयीच्या जागतिक सर्वेक्षणानुसार, भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण प्रचंड आहे. भारतात २७.५ कोटी प्रौढ व्यक्ती, म्हणजे एकुणात ३५ टक्के लोकसंख्या, तंबाखूचे सेवन कोणत्या तरी प्रकाराने करीत असते. ही संख्या वाढतच चालली आहे.

तंबाखूच्या सेवनामुळे हृदयविकार, पक्षाघात, फुफ्फुसाचे रोग, महिलांच्या गरोदरपणात समस्या, तसेच अनेक प्रकारचे कर्करोग होत असतात. सध्याची परिस्थिती व आकडेवारी पाहता, धूम्रपान करणाऱ्यांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत. मुलांनाही ही घातक सवय पटकन लागलेली दिसते. लहान मुले, तरुण-तरुणी यांना या घातक सवयीपासून दूर ठेवण्यासाठी तातडीने उपाय योजायला हवेत. 

भारतात धूम्रपान व तंबाखू सेवनाच्या विरोधात मोहिमा निघाल्या नाहीत, असे नाही. या मोहिमांमुळे परिस्थितीत काही बदल होऊन तंबाखूसेवनाचे प्रमाण काही टक्क्यांनी कमीही झाले आहे. २००९ मध्ये हे प्रमाण ३४.६ टक्के होते, ते २०१७ मध्ये २८.६ टक्के झाले आहे. अर्थात तरीदेखील तंबाखूसेवनाचा धोका सार्वजनिक आरोग्याला तितक्याच प्रमाणात आहे.

सर डॉ. (हुझ), हुझैफा खोराकीवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी व विश्वस्त, वोक्हार्ट फाऊंडेशन यांनी आपले मत नोंदविले. आतापर्यंतचे धूम्रपानविरोधाचे प्रयत्न हे त्याचे दुष्परिणाम सांगण्यापुरतेच होते. विशेषतः नवयुवकांना धूम्रपानाचे आकर्षण वाटू नये, यासाठी मोहिमांमध्ये भर देण्यात आला होता. मात्र तंबाखूच्या सेवनामुळे वाढणाऱ्या रोगांची व्याप्ती लक्षात घेता, अधिक व्यापक भूमिका घ्यायला हवी. सेवन करणाऱ्यांचे विविध  स्वरुपात वर्गीकरण करून त्या त्या वर्गावर लक्ष केंद्रित करून योजना आखायला हव्यात. भारतातून तंबाखूचे पूर्णपणे उच्चाटन करण्याचे उद्दीष्ट ठेवायला हवे. प्रौढ शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते, विविध सामाजिक गट यांनी प्रबोधन केल्यास, तसेच त्यांना तज्ज्ञांनी साथ दिल्यास ही चळवळ आकाराला येईल. धूम्रपान करण्यास नुकतीच सुरुवात करणारे, धूम्रपान सोडून देणारे किंवा काही काळानंतर पुन्हा सुरू करणारे असे विविध वर्ग लक्षात घेऊन त्यांच्यासाठी नेमके काय करायला हवे, याचा अभ्यास करायला हवा. तंबाखूवर जबरदस्त स्वरुपाची करआकारणी झाल्यास तो एक प्रभावी उपाय ठरू शकेल. केवळ सिगारेटच नव्हे, तर इतरही तंबाखूजन्य पदार्थही या करातून सरकारने वगळायला नकोत. तसेच सिगारेटविरोधी मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनी सरकारी योजनाही राबविण्यास मदत केली पाहिजे. विशेषतः धूम्रपानाचे अप्रत्यक्षपणे वाईट परिणाम भोगणाऱ्यांसाठी काही काम करायला हवे. एकंदरीत, आरोग्यविषयक संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक गट व स्वयंसेवी संघटना या सर्वांनी सरकारच्या मदतीने देशाच्या खांद्यावरील तंबाखूचे हे जड ओझे फेकून द्यायला हवे. 

टॅग्स :धूम्रपानआरोग्य