लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत गुरुवारी दिवसभरात ७ हजार ११८ प्रवासी मायदेशी परतले. त्यात मुंबईतील ६२७ प्रवाशांचा समावेश आहे.
गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत दुबईहून २०७, तर लंडन १५०, न्यू यॉर्क १२२ आणि रियाधहून १४८ प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल झाले. परदेशातून हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. परंतु, विलगीकरणापासून पळवाट शोधण्याचे प्रकार उघडकीस आल्याने नुकतेच या नियमावलीत बदल करण्यात आले. नव्या नियमावलीनुसार, मुंबई विमानतळावर उतरल्यापासून प्रवाशांची पडताळणी, वाहतूक व संस्थात्मक विलगीकरण ही सर्व प्रक्रिया कोणत्याही दोषांविना पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
------------------