मुंबई : राज्य शासनाने नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने मुंबई विद्यापीठात या वर्षी ६३ नवी महाविद्यालये सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसार सुचवलेल्या नव्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास विद्यापीठात यंदा ५ हजार जागांची भर पडणार आहे.विद्यापीठाकडे नव्या महाविद्यालयांसाठी एकूण १५५ संस्थाचालकांनी प्रस्ताव सादर केले होते. मात्र प्रस्ताव छाननीनंतर आणि प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर १२५ महाविद्यालयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. विद्यापीठ कायद्यानुसार नव्या महाविद्यालयांना १५ जूनपूर्वी मंजुरी मिळणे अपेक्षित होते. मात्र मंजुरीची अंतिम तारीख उलटल्याने या महाविद्यालयांच्या जागांवर पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेश देता आले असते. परिणामी, महाविद्यालयांचे नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांना अधिक जागा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासनाने मंजुरी देण्याच्या तारखेत ३१ जुलैपर्यंत वाढ केली. सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे शासनाकडे प्रस्तावित असलेल्या ६३ महाविद्यालयांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय विद्यापीठाने पाठवलेल्या १२५ प्रस्तावांपैकी अधिकाधिक प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नवी मुंबई या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात सर्व नवी महाविद्यालये सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)
विद्यापीठात ६३ नवी महाविद्यालये
By admin | Published: June 24, 2016 4:49 AM