मुंबई :
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांत घरगुती मूर्ती विसर्जनाची टक्केवारी ६३.६३ टक्क्यांनी वाढली आहे. पाचव्या दिवशी घरगुती मूर्ती विसर्जनाची संख्या तब्बल १८ हजार २०६ इतकी नोंदवली गेली.
यंदा एकूण २९ हजार ७९२ घरगुती गणेशमूर्ती, तर ५९८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या आहेत. गतवर्षी (२०२२) पाचव्या दिवशी ११ हजार ५८६ घरगुती, तर ३७७ सार्वजनिक गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या होत्या. पाचव्या दिवसाचे विसर्जन संपल्यानंतर पालिकेने वेगवेगळ्या समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवली.
मार्वे किनारी विद्यार्थ्यांची स्वच्छतापी उत्तर विभागाच्या वतीने आणि धीरजलाल शहा महाविद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी एकत्रित मिळून मार्वे समुद्र किनारी स्वच्छता केली. या मोहिमेत ४ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला, तर ए विभागाच्या वतीने बुधवार पार्क येथे स्वच्छता मोहीम राबवीत ४ मेट्रिक टन कचरा संकलित केला.
निर्माल्यासह प्लास्टिक, तसेच भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा गोळा करून समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. जी उत्तर विभागात, माहीम समुद्र किनारी पालिका कर्मचाऱ्यांसह ‘युनायटेडवेज’ या स्वयंसेवी संस्थेच्या ६२ स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवीत ५.६ मेट्रिक टन कचरा संकलित केला.
के पश्चिम विभागाच्या वतीने वर्सोवा समुद्र किनारी ५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ४० स्वयंसेवकांनी त्यात सहभाग घेतला. के पश्चिम विभागाच्या वतीने ‘वारसा आणि पर्यावरण संवर्धन फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या ५० स्वयंसेवकांच्या सहकार्याने जुहू समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात ५.५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.