मुंबई :महापालिकेच्या एम-पूर्व विभागातील मानखुर्द-मंडाळा या खाडीलगत असलेल्या भूभागावर भंगारमालाची ६३ अनधिकृत गोदामे आढळली होती. ही सर्व अनधिकृत गोदामे महापालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान तोडण्यात आली आहेत. शिवाय, येथील सहा आस्थापनांवर पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले असून, १९ आस्थापनांचे पाणी व विजेची जोडणी खंडित करण्यात आली आहे, अशी माहिती एम/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे. या कारवाईमुळे या भागातील भंगारमालाला आग लागण्याचे प्रकार नियंत्रणात आणण्यास मदत होईल, अशीही माहिती किलजे यांनी दिली. महापालिकेच्या परिमंडळ-५चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार एम-पूर्व विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या या कारवाईत महापालिकेच्या एम-पूर्व विभागाचे ५० कामगार, कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. तसेच संबंधित पोलीसठाण्याचे १७ पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्या मदतीने ही कारवाई पार पाडण्यात आली. या कारवाईसाठी पाच जेसीबी, सहा डंपर यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामुग्री वापरण्यात आली, अशीही माहिती किलजे यांनी दिली.
६३ गोदामांवर पालिकेची कारवाई; ६ आस्थापनांवर गुन्हे तर १९ आस्थापनांचे वीज-पाणी खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:16 AM