मुंबईत ६३५ कोरोना बाधित; दहा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:25+5:302021-07-15T04:06:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी मुंबईत पुन्हा किंचित वाढ दिसून आली. दिवसभरात ६३५ बाधित रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी मुंबईत पुन्हा किंचित वाढ दिसून आली. दिवसभरात ६३५ बाधित रुग्ण सापडले, तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर मात्र ०.०७ टक्के एवढा आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ९२८ दिवसांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख २९ हजार २५० रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख चार हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ६५४ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सहा हजार ९८९ सक्रिय रुग्ण आहेत. मृत्युमुखी पडलेल्या दहा रुग्णांपैकी पाच रुग्णांना सहव्याधी होत्या.
मृतांमध्ये सहा पुरुष तर दोन महिला रुग्णांचा समावेश होता. चार मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर चार रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दोन रुग्ण ४० वर्षांखालील होते. दिवसभरात ३५ हजार ९६८ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७६ लाख २८ हजार ४६९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.