म्हाडाच्या ६३९ सदनिका; प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 03:50 PM2020-07-21T15:50:29+5:302020-07-21T15:54:02+5:30
वांद्रे मुख्यालयात अर्ज उपलब्ध; पात्र अर्जदारांसाठी अर्ज विक्रीला प्रारंभ
मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या नाशिक मंडळातर्फे नाशिक व अहमदनगर येथील श्रीरामपूरमधील गृहनिर्माण योजनेतील ६३९ निवासी सदनिका एकरकमी खरेदी पद्धतीने विक्री करण्यासाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अटी व शर्ती शिथील करून प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वाटप केल्या जाणाऱ्या या सदनिका आहेत.
अर्जदाराचे वय अर्ज करतेवेळी १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या गृहनिर्माण भवन, गडकरी चौक येथील कार्यालयातील मिळकत व्यवस्थापन विभागामध्ये तसेच उपरोक्त योजनांच्या ठिकाणी अर्ज विक्री सुरु झाली आहे. याच ठिकाणी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात जनसंपर्क विभाग, कक्ष क्रमांक २० मध्ये ही अर्ज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी म्हाडाच्या https://mhada.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. योजनेसंबंधित इतर अटी व शर्ती विहित नमुन्यातील अर्जासोबत देण्यात येणार आहेत. काही सदनिका नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती व विमुक्त जाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत. आरक्षित गटातील अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करणे बंधनकारक आहे. आरक्षणाचा तपशील अर्ज विक्रीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी पाच हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी दहा हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी पंधरा हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे.