मुंबई : लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना लगाम लावण्यासाठी मध्य रेल्वेने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.
मुंबई विभागात आरपीएफने गेल्या आठ महिन्यांत एकूण १२८ तिकीट दलालांना पकडले आहे. त्यांच्याकडून ६४ लाख ६१ हजार रुपयांची २,८५० तिकिटे जप्त केली.गेल्या महिन्यात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री करणाऱ्यांवर १० गुन्हे नोंदविण्यात आले असून, या कारवाईत आरपीएफने तीन लाख ७८ हजारांची १७९ ई-तिकिटे जप्त केली आहेत.
नोव्हेंबरमध्ये ११ जणांना अटक :
मुंबई विभागातील आरपीएफ पोलिसांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये रेल्वे दलालीच्या एकूण १० प्रकरणांचा छडा लावला. रेल्वे कायद्यांतर्गत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. दलालांकडून ३,७८,७४७ रुपये किमतीची १७९ तिकिटे जप्त करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.