Join us

भायखळ्यातून ६४ हजारांच्या बनावट नोटा जप्त; दोघा परप्रांतीयांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 1:46 AM

भारतीय चलनातील दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यास आलेल्या दोघा परप्रांतीय तरुणांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-३च्या पथकाने अटक केली.

मुंबई : भारतीय चलनातील दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यास आलेल्या दोघा परप्रांतीय तरुणांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-३च्या पथकाने अटक केली. मोहम्मद शाहीद जीनु शेख (२४) व अब्दुल अबझार शेख (१८) अशी आरोपींची नावे असून ते झारखंड येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून दोन हजार रुपये किमतीच्या एकूण ३२ नोटा जप्त करण्यात आल्याचे प्रभारी निरीक्षक जगदीश साईल यांनी सांगितले.झारखंड येथील दोघे जण भायखळ्यातील जमाली बोहरी मशिदीच्या परिसरातील गिरी किरण शौचालयाजवळ बनावट नोटा घेऊन येणार आहेत, अशी माहिती कक्षाचे हवालदार गणेश गोरेगावकर व दीपक चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुपारपासून परिसरात पाळत ठेवली. संशयास्पद आढळणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे २ हजार रुपयांच्या ३२ नोटा सापडल्या. नोटांचा कागद, छपाई आणि त्यावरील क्रमांक तपासल्यानंतर त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याचे जगदीश साईल यांनी सांगितले. या कारवाईत उपनिरीक्षक नवनाथ उघडे, साहाय्यक फौजदार रमेश गावित, राहुल अनभुले आदींचा समावेश होता.