Join us  

सातारा पोटनिवडणुकीसाठी ६४.२५% मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 4:32 AM

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ६०.४६ टक्के मतदान झाले.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ६०.४६ टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ६४.२५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी सोमवारी रात्री पत्रकार परिषदेत दिली.

सिंह म्हणाले की, यंदा मतदार यादीत नावे नसल्याची कोणतीही तक्रार आली नाही. राज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात ८३.२० टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी ८०.१९, कागल ८०.१३ टक्के, शिराळा ७६.७८ तर रत्नागिरी ७५.५९ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात ४०.२० टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये ४१.२० टक्के, कल्याण पश्चिममध्ये ४१.९३ तर अंबरनाथमध्ये ४२.४३, वर्सोवा येथे ४२.४३ आणि पुणे कॅटोन्मेंट येथे ४२.६८ टक्के मतदान झाले.

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष वापरात १,१२,३२८ बॅलट युनिट (बीयू), प्रत्येकी ९६,६६१ इतक्या कंट्रोल युनिट (सीयू) आणि व्हीव्हीपॅट मशिन्स होत्या. तर राखीव २४,६२५ बीयू, २१,२७७ सीयू आणि २८,९९२ व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात तीन हजार इव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्स (५२२ बीयू, ९४९ सीयू आणि १,९७४ व्हीव्हीपॅट) नादुरूस्त झाल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४,०६९ ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये ६६५ बीयू (०.५९%), ५९६ सीयू (०.६२) आणि ३,४३७ व्हीव्हीपॅट (३,५६%) नादुरुस्त झाल्या. प्रारुप मतदानाच्या वेळी तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली ईव्हीएम व्हीव्हीपॅट त्वरीत दुरुस्त करण्यात तसेच बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदानप्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

ईव्हीएम यंत्राबाबत ३६१ तक्रारी

ईव्हीएम संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १५२, शिवसेना ८९ व इतर १२० अशा एकूण ३६१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारी संबधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :उदयनराजे भोसलेश्रीनिवास पाटीलनिवडणूकमतदान