भार्इंदर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा निवडणूक प्रशासनाने पालिकेतील सुमारे ९० टक्के कर्मचार्यांची नियुक्ती केली होती. त्याबदल्यात त्यांना कामानुसार भत्ता दिला गेला असला तरी तो कमी मिळाल्याचा आरोप या कर्मचार्यांनी केला आहे. निवडणुकीच्या शेवटी म्हणजेच मतमोजणीवेळी काही मोजक्याच कर्मचार्यांना नियुक्त करण्यात आले. मतदान यंत्रे सील करण्यासाठी निवडणूक प्रशासनाने पालिकेतील सुमारे ९५ कर्मचार्यांना जुंपले होते. हे काम ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये १६ मे या मतमोजणीच्या दिवशीच पार पडले. तात्पुरत्या शासकीय कामाचा मोबदला म्हणून नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना भत्ता देण्यात येतो. परंतु पालिकेच्या कर्मचार्यांना यंत्र सिलिंगच्या कामाचा भत्ताच देण्यात आला नसल्याचे उजेडात आले आहे. यावर संतप्त झालेल्या सुमारे ३० शिपायांनी प्रशासनाकडून आपल्या हक्काचा भत्ता त्यांच्याशी वाद घालून अखेर मिळवलाच. परंतु उर्वरित सुमारे ६५ कर्मचार्यांना अद्याप भत्ता देण्यात आलेला नाही. प्रत्येकी सुमारे ४५० रुपयांप्रमाणे २९ हजार २५० रुपये भत्ता वरिष्ठांनी परस्पर लाटल्याचा आरोप या कर्मचार्यांनी केला आहे. त्या वेळचे निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप शिंदे यांना संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगून साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय काटकर यांना संपर्क साधण्यास सांगितले. काटकर यांना मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही.
पालिकेचे ६५ कर्मचारी निवडणूक भत्त्यापासून वंचित
By admin | Published: May 24, 2014 1:24 AM