बिल भरण्यासाठी ६५ टक्के वीज ग्राहक ‘ऑनलाइन’, ३५ टक्के ग्राहकांची भर
By सचिन लुंगसे | Published: July 3, 2023 04:00 PM2023-07-03T16:00:17+5:302023-07-03T16:01:02+5:30
दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा
मुंबई: महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास तब्बल ६५ टक्के ग्राहकांनी पसंती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के ग्राहकांची भर पडली आहे. सद्यस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत. महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त ५००० पेक्षा जास्त वीजबिल असणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी महावितरणने RTGS /NEFT द्वारे वीजबिल भरणा करण्यासाठीची देखील सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक असलेला ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशील वीज बिलावर छापण्यात आलेला आहे.
- पुणे परिमंडलातील २२ लाख ८३ हजार ग्राहकांनी सर्वाधिक १२०२ कोटी ७६ लाखांचा वीजबिलांचा भरणा केला आहे.
- कल्याण परिमंडलातील १९ लाख ७ हजार ग्राहकांनी ७२५.७९ कोटी
- भांडूप परिमंडलामध्ये १७ लाख ३१ हजार ग्राहकांनी १००५ कोटी ४१ लाखांच्या बिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.
- बारामती येथे १० लाख ६८ हजार ग्राहकांनी ५१९.३५ कोटी
- नाशिक येथे १० लाख ५३ हजार ग्राहकांनी ४६९.६४ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.
महावितरणचे उच्चदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहक दरमहा ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करीत असून महावितरणच्या उच्चदाब व लघुदाबाच्या १ कोटी १० लाख ग्राहकांनी एकूण वसुलीच्या रकमेपैकी तब्बल ५ हजार ७५० कोटी रकमेचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे.
सूट मिळते
‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर वीजबिलाचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे.
एका क्लिकवर वीजबिल
विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवरवीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे.
पेमेंट व सेटलमेंट
ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पध्दतीस आरबीआय बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतुदी लागू आहेत. तरी जास्तीतजास्त ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिलांचा भरणा करण्याचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.