कर्जाच्या फोनने भरली धडकी; लाडकी बहीण योजनेच्या नावाने कर्ज घेत ६५ महिलांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:37 IST2025-04-09T09:34:54+5:302025-04-09T09:37:02+5:30
एकाच भागातील ६५ महिलांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरली नसल्याने फायनान्स कंपनीने प्रत्येकीस भेटून चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघड झाला.

कर्जाच्या फोनने भरली धडकी; लाडकी बहीण योजनेच्या नावाने कर्ज घेत ६५ महिलांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हातावर पोट असलेल्या मानखुर्दमधील एक नाही तर ६५ महिलांना अचानक ‘मोबाइलचे हफ्ते थकले, पैसे कधी भरणार’ या कॉलने धडकी भरली. फायनान्स कंपनीकडून वसुलीसाठी तगादा सुरू होताच झटपट लोनसाठी दिलेल्या कागदपत्रांमुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या ६५ महिलांचे तपशील घेत ६५ महिलांच्या नावे आयफोन खरेदी करत एकूण २० लाखांचे कर्ज परस्पर काढण्यात आले आहे.
याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या वतीने पोलिसांत तक्रार देताच, गुन्हा नोंदवला आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे मिळवून देतो सांगून त्यांच्या नावावर कर्ज घेत फसवणूक केल्याचे समोर आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बजाज फायनान्सचे आकाश ढमाळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एकाच भागातील ६५ महिलांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरली नसल्याने फायनान्स कंपनीने प्रत्येकीस भेटून चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघड झाला.
आयफोनसाठी गॅलरीत नेले
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फायनान्स कंपनीचे रोशन आणि दानिश यांना हाताशी धरत शंकर घाडगे, पद्मा कांबळे, सुलोचना दिवाणजी, सोनल नांदगावकर यांनी सुमित गायकवाड, बोराडे या व्यक्तीच्या मदतीने या ६५ महिलांना त्यांची आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रे दिल्यास कर्ज मिळवून देण्याची ऑफर दिली.
त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत आरोपींनी संबंधित वित्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कुर्ला, अंधेरी येथील आयफोन गॅलरीत नेले. तेथे त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे २० लाख रुपयांचे आयफोन कर्जावर घेतले. पुढे ते फोन अन्य आरोपी शाहरुख याने अन्य व्यक्तींना विकले.
सेल्फीही काढले
आयफोन घेताना त्या महिलांचे सेल्फीही घेतले. महिलांना विश्वास बसावा म्हणून आरोपींनी सुरुवातीला प्रत्येकी दोन ते पाच हजार रुपये त्यांच्या हाती ठेवले. तीन महिन्यांने दहा हजार असे पुढे वाढत लाखभर पैसे मिळण्याचे आमिष या महिलांना दाखविण्यात आले होते.
आम्ही कुठून देणार पैसे?
शीला साळुंखे सांगतात, हातावर पोट. त्यात आता या कॉलमुळे आम्ही काय करायचे? कुठून पैसे द्यायचे? हा प्रश्न सतावत आहे. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, असे त्या म्हणाल्या.
अचानक आलेल्या फोनने झोप उडाली...
फसवणूक झालेल्या रेश्मा भालेराव सांगतात, घरी पती आणि सासू आहे. घरकाम करून उदरनिर्वाह सुरू आहे. आरोपींनी फक्त कागदपत्रे दिल्यास काहीही पैसे न भरता कर्ज मिळवून देण्याची ऑफर दिली. आम्हीही पैसे भेटणार म्हणून जाळ्यात अडकलो. या प्रकाराने रात्रीची झोप उडाल्याचे त्या सांगतात.
रेश्मा यांच्या माहितीनुसार, मोबाइलच्या गॅलरीत नेत कागदपत्रे घेतले. तसेच हाती फोनसोबतच सेल्फी घेतला. त्यानंतर फोन त्यांच्याकडे घेतले. तेव्हाही संशय आला म्हणून चौकशी करताच मोबाइलचे हफ्ते कंपनी भरणार आहे. तुम्हाला एकही रुपया देण्याची गरज नाही, असे सांगितले. तसेच हातात ५ हजार रुपये दिल्याने आणखीन विश्वास बसला. मात्र, तीन महिन्यांत बँकेकडून कॉल सुरू झाले. न घेतलेल्या मोबाइलचे पैशांसाठी धमकावणे सुरू झाले.