Join us

धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते धुणार

By जयंत होवाळ | Published: November 03, 2023 9:14 PM

रस्ते धुण्यासाठी १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात

मुंबई: हवेतील प्रदुषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने उपाययोजनांना गती दिली आहे. याअंतर्गत सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुवून काढण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्‍ते धुण्‍याचे काम केले जात आहे. त्यासाठी पाण्याचे १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत.

पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्याने वापर केल्याने पाण्याची नासाडी होणार नाही, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांना वेग देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी बैठक घेतली.  २४ प्रशासकीय विभागांतील ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या रस्‍त्‍यांवर तसेच पदपथांवर दररोज विशेष स्वच्छता केली जात आहे. रस्ते व पदपथांवर प्रारंभी ब्रशिंग करुन नंतर पाणी फवारणी केली जात आहे. ज्‍या रस्‍त्‍यांवर तसेच पदपथांवर अशी कार्यवाही करावयाची आहे, त्‍यांची निवड विभाग कार्यालयांनी केलेली आहे.

जिथे वाहनांची व नागरिकांची अधिक वर्दळ असते, अशा रस्ते व पदपथांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा त्याचप्रमाणे विभागातील पाण्याचे स्थानिक स्रोत ( तलाव, विहीर, कूपनलिका) यामधील पाण्याचा वापर करुन रस्ते व पदपथ धुतल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे उप आयुक्त ( घन कचरा व्यवस्थापन ) चंदा  जाधव यांनी सांगितले. नागरिकांच्‍या दैनंदिन जीवनमानात व्‍यत्यय येवू नये यासाठी कमी वर्दळीच्या कालावधीमध्ये पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान,तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात कार्यवाही केली जात आहे.

रस्ते व पदपथ धुण्याचे काम ३ ते ४ तासांत पूर्ण करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. स्वच्छता करणाऱया वाहनांची संख्‍या वाढविण्‍यात येत आहे.  दरम्यान बांधकामाचा राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या यंत्रणेसोबत व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टम यंत्रणा लिंक करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. टोल प्लाझा स्‍वच्‍छतेसाठी महाराष्ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळालाही कळवण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईप्रदूषण