पाणी टंचाई आराखड्यात ६६ गावे
By admin | Published: June 13, 2014 11:53 PM2014-06-13T23:53:11+5:302014-06-13T23:53:11+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने पाणी टंचाई सोडविण्याकरिता पाणी टंचाई आराखडा दरवर्षी तयार करण्यात येतो.
बिरवाडी : रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने पाणी टंचाई सोडविण्याकरिता पाणी टंचाई आराखडा दरवर्षी तयार करण्यात येतो. या समस्येवर मात करण्याकरिता योजना देखील राबविण्यात येते. यंदा महाड तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त आराखड्यामध्ये ६६ गावांचा समावेश करुन घेण्याकामी जिल्हा परिषद प्रशासनाला भाग पाडण्यात आले आहे.
याबाबत जलसंधारणच्या बैठकीमध्ये माजी उपाध्यक्ष बाळ राऊळ, राजिप सदस्य सुरेश कालगुडे, निलेश ताठरे यांनी जोरदार आवाज उठवला होता. एक भाग म्हणून महाड पंचायत समितीमध्ये पाणी टंचाई समस्या सोडविण्याकरिता तातडीची बैठक सभापती विजय धाडवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
महाड तालुक्यामध्ये पाणी टंचाईवर मात करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडे ६६ गावांना बोअरवेल उपलब्ध करुन देण्याकरिताचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून ज्यांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्राप्त होईल त्यांनी आपल्या गावांमध्ये संबंधीत एजन्सीकडून तात्काळ बोअरवेल मारुन घ्यावी, असे सुचविण्यात आले असून यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण येणार असल्याची माहिती बाळ राऊळ यांनी सभागृहाला दिली आहे व ही रक्कम पंचायत समितीकडे वर्ग करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील संस्थांना दिलासा मिळणार आहे.
पाणी टंचाई आराखडा जाहीर झाल्यापासून ज्या वेगाने प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी वर्गाने काम केले पाहिजे त्या वेगाने काम होत नसल्याने पाणी समस्या मार्गी लागत नसल्याने ग्रामीण भागातील जनता ताहानलेली असल्याचा आक्षेप राऊळ यांच्याकडून घेण्यात आला.
पाणी टंचाई आराखड्यातील ६६ गावांना बोअरवेलची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी या सभेकरिता पाणी टंचाईग्रस्त ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक हजर नसल्याने सभापती विजय धाडवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पाणी टंचाईचा प्रस्ताव पाठविताना योग्यती कागदपत्रे सोबत जोडावीत याकरिता पाणी टंचाई आराखड्याचा प्रस्ताव पाठविण्याची माहिती ग्रामसेवकांनी द्यावी अशी सूचना केली. (वार्ताहर)