मनोहर कुंभेजकर
मुंबई - मोबाईलवरून कोणाला कॉल केल्यावर संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरसशी लढत आहे, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही. त्यांच्याशी भेदभाव करू नका, त्यांची काळजी घ्या..अशी सुरुवातीला टोन ऐकू येते. मात्र, कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, अशी मुंबईतील अनेक हॉस्पिटलमधील सद्यस्थिती आहे. रविवारी वर्सोवा, यारी रोड येथील ६६ वर्षीय कोरोना रुग्णांला चक्क कांदिवलीच्या कामगार विमा योजनेच्या( इएसआयएस) हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर मिळाला नसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या या हॉस्पिटलमध्ये सुमारे ७० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्यातील बहुसंख्य रुग्ण पालिकेचे आहेत.
वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी सदर घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अन्य मान्यवरांना ट्विट करून उजेडात आणली. सदर इसम हा उपचारासाठी इतर हॉस्पिटलमध्ये गेला होता. मात्र, त्याला बेड मिळाला नाही. त्यामुळे अखेर कांदिवली (पूर्व) येथील इएसआयएस हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. त्याला श्वासोश्वाचा त्रास होऊ लागला. मात्र, या हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटर मिळाला नसल्याने रविवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती आमदार डॉ.लव्हेकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली. वर्सोवाच्या अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याने त्यांना कांदिवली व अन्य लांब ठिकाणी उपचारासाठी जावे लागते ही सद्यस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात या हॉस्पिटलच्या उप वैद्यकीय अधिक्षक डॉ.रेश्मा वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांना सदर घटना सांगितली. येथे फक्त ११ व्हेंटिलेटर कार्यरत आहेत असे त्यांनी सुरुवातीला सांगितले. तसेच काल पहाटे चारच्या सुमारास ५० वर्षीय महिलेने या हॉस्पिटलमध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी चर्चा आहे. याबाबत माहिती विचारली असता, मग मात्र त्यांनी आपला पवित्रा बदलला. मै आपको फोन पे कुछ नही बताऊंगी,आपकी शिकयत आप ms.andheri@esis.nic.in ये मेलपर किजीए, आपका सवाल का जबाब जरूर मिलेगा असे उत्तर त्यांनी दिले. तर या हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.बी.गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दुजोरा दिला नाही.