मुंबई - राज्यातील जेएन १ व्हेरिएंट रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता ती २५१ वरून थेट ६६२ वर पोहाेचली आहे. बुधवारपर्यंत ४५१ जेएन १ व्हेरिएंट रुग्णांची नोंद होती. आता राज्यात जेएन १ व्हेरिएंट रुग्णांची एकूण नोंद ६६२ एवढी झाली आहे. सौम्य लक्षणांचा मानला जाणाऱ्या या रुग्णांची संख्या मात्र एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, बुधवारी राज्यातील जेएन १ व्हेरिएंट रुग्णसंख्या जिल्हा निहाय पाहिल्यास पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून पुणे ३२७, ठाणे ८८, नागपूर ५५, छ. संभाजीनगर ५४, मुंबई ३६, अमरावती १८, रायगड १४, सोलापूर १३, कोल्हापूर ११, सांगली सात, रत्नागिरी आणि जळगाव अनुक्रमे पाच, अहमदनगर, बीड तसेच चंद्रपूर प्रत्येकी तीन, तर अकोला, गडचिरोली, जालना, नांदेड, नाशिक आणि धाराशिव प्रत्येकी दाेन, तसेच नंदूरबार, सातारा, सिंधुदूर्ग, आणि यवतमाळ या जिल्ह्यात प्रत्येकी एक अशी नोंद झाली आहे. १,१९८ आरटीपीसीआर चाचणी, तर ८,२२३ आरएटी चाचण्यांची नोंद प्रयोगशाळेत झालेली आहे. आजचा पॉझिटिव्हीटी दर ०.४७ टक्के एवढा आहे.
राज्यात एक मृत्यू, २१६ सक्रिय रुग्णराज्यात बुधवारी एक कोविड मृत्यू नोंद करण्यात आला आहे. यापूर्वी मागच्या गुरुवारी एका मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे.
दरम्यान, बुधवारी राज्यात ४५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर मुंबईत १० रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच राज्यात बुधवारी एकूण २१६ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तसेच ५६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात बुधवारी ९,४२१ चाचण्या झाल्या आहेत.