Join us  

गणेश मूर्तिकारांसह ६६६ विजेत्यांना पारितोषिके

By admin | Published: April 11, 2017 3:03 AM

राज्य शासनाच्या लोकमान्य महोत्सव आणि लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या १ हजार ६८१ गणेश मंडळांपैकी

मुंबई : राज्य शासनाच्या लोकमान्य महोत्सव आणि लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या १ हजार ६८१ गणेश मंडळांपैकी, ६३१ मंडळे आणि ३५ मूर्तिकार बक्षिसास पात्र ठरली आहेत. या अभियानाचा राज्यस्तरीय कार्यक्रम लवकरच मुंबईत आयोजित केला जाणार असून, त्यात सर्व ६६६ विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या ऐतिहासिक घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्ताने, राज्य सरकारने लोकमान्य महोत्सव आणि लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविले होते. या संदर्भात सह्याद्री अथितीगृहात बैठक झाली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीस संजय फांजे, सुरेश सरनौबत, हेमंत रासने, नरेश दहिबावकर यांच्यासह, या अभियानाचे इतर पदाधिकारी आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.लोकमान्य महोत्सव आणि लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव अभियानात एकूण १ हजार ६८१ गणेशमंडळांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ६३१ गणेश मंडळे आणि ३५ मूर्तिकार बक्षिसाला पात्र ठरले आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या, परंतु बक्षिसास पात्र न ठरलेल्या १०१५ गणेशमंडळांनाही प्रत्येकी ५ हजार रुपयांचे सहभागिता पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी या वेळी दिली. पारितोषिक विजेत्या गणेश मंडळामध्ये तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर प्रथम पारितोषिक मिळवलेल्या मंडळांची संख्या २६२ इतकी आहे, तर द्वितीय पारितोषिक विजेत्यांची संख्या २२३ असून, १८१ मंडळांना तृतीय पारितोषिके मिळाली आहेत. यात ३५ गणेश मूर्तिकारांचाही समावेश आहे. या अभियानात, तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना पंचसूत्री निश्चित करून देण्यात आली होती. स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाओ-बेटी पढाओ, व्यसनमुक्ती आणि जलसंवर्धन अशी ही पंचसूत्री होती. या संकल्पनेशी निगडित देखावा करणे, गणेश मंडळांना आवश्यक होते. तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांच्या देखाव्याची पाहणी करण्यात आली. यासाठी प्रत्येक स्तरावर समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्राप्त अर्जांची सर्व निकषांच्या आधारे तपासणी करून बक्षिसांसाठी मंडळ आणि मूर्तिकारांची निवड करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. या अभियानाचा राज्यस्तरीय कार्यक्रम लवकरच मुंबईत आयोजित केला जाणार आहे. (प्रतिनिधी)३५ मूर्तिकार बक्षिसाला पात्र अभियानात एकूण १ हजार ६८१ गणेशमंडळांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ६३१ गणेश मंडळे आणि ३५ मूर्तिकार बक्षिसाला पात्र ठरले आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या, परंतु बक्षिसास पात्र न ठरलेल्या १०१५ गणेशमंडळांनाही प्रत्येकी ५ हजार रुपयांचे सहभागिता पुरस्कार देण्यात येणार आहेत.