रेल्वे हद्दीत ६६७ बेवारस मृतदेह विद्रूप चेहरे; अवयवांवरून ओळख पटविण्याचे मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:52 AM2023-12-07T09:52:17+5:302023-12-07T09:52:56+5:30
नोव्हेंबरदरम्यान महिन्यांच्या कालावधीत २,३५४ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून, यापैकी ६६७ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
मुंबई : मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान महिन्यांच्या कालावधीत २,३५४ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून, यापैकी ६६७ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. अशा प्रकारच्या मृतदेहांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांना कसरत करावी लागत असल्याने रेल्वे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींचे चेहरे किंवा इतर अवयवांवरून ओळख पटविणे किंवा त्याचा शोध घेणे हे रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच वाढली आहे. कर्जत ते सीएसएमटी, पालघर ते चर्चगेट आणि पनवेल ते सीएसएमटी यादरम्यानच्या स्थानकांतूनही दररोज ७५ लाख जण लोकलने प्रवास करतात. प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढणे-उतरणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. यामुळे अपघातांच्या घटना आहेत. यात रेल्वे रूळ ओलांडणे, दरवाजात उभे असताना तोल जाणे, लोकलमधील गर्दीतून पडून, ओव्हरहेड तारेच्या धक्क्याने मृत्यू अशा अपघातांत प्रवाशांचा मृत्यू होतो.
उत्तर भारतातील तरुण रोजगाराच्या शोधासाठी मुंबईत येतात. लोकलने दरवाजात उभे राहून प्रवास करताना किंवा गाडी सुरू असताना ती पकडण्याच्या प्रयत्नात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा प्रवाशांची ओळख पटविण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येतात. अशा वेळी मग पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्या मृतदेहांची ओळख पटविणे प्रचंड जिकिरीचे आणि कष्टाचे ठरते - मनोज पाटील, उपायुक्त, मध्य रेल्वे
शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा :
मृतांच्या वारसाचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिस विविध मार्ग अवलंबतात. मृताची माहिती मिळवणे, तपास यादी वेगवेगळ्या स्थानकांना पाठविणे, मृताची छायाचित्रे स्थानकांत, सार्वजनिक ठिकाणी फलकांवर लावणे. अन्य प्रवाशांकडे चौकशी करणे अशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते.
अशा प्रकारे लावली जाते मृतदेहाची विल्हेवाट :
अपघातात मृत्यू झालेल्या बेवारस व्यक्तीचा मृतदेह हा नियमानुसार सात दिवस ठेवू शकतो; परंतु त्याच्या वारसांचा शोध लागावा यासाठी हे मृतदेह १५ दिवस शवागारात ठेवले जातात. या दिवसांत मृतांच्या वारसांचा शोध लागला नाही तर त्यांची नियमानुसार पोलिसांच्या मार्फत विल्हेवाट लावली जात आहे.
वारसांना मरण पावलेल्या व्यक्तींची ओळख पटावी यासाठी त्यांचे डीएनएही काढून ठेवले जात आहेत. तीन महिन्यांनंतर त्या फाइलची समरी केली जाते. सात वर्षे ही फाइल सुरू असते, परंतु वारस न मिळाल्यास बंद केली जाते.