लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
एकीकडे शाळा सुरू करायच्या की नाहीत या संदर्भात शासन आणि शिक्षण विभाग अजूनही चाचपण्या करीत असताना दुसरीकडे पालक मात्र आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी तयार असल्याचे विविध सर्वेक्षणांमधून समोर येत आहे.
देशाच्या मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांतील, पहिली ते दहावीच्या वर्गातील, तब्बल १० हजार ५०० पालकांचे सर्वेक्षण केल्यानंतर ५९ टक्के पालकांनी शाळा बंद असल्याने आपल्या मुलांचे शैक्षणिक होत असल्याचे मान्य केले आहे. त्यातही मुंबईसारख्या मेट्रो शहरातील तब्बल ६७ टक्के पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दाखविले असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
मॉल, दुकाने यांच्यासह अनेक निर्बंध शिथिल होत असताना १८ महिन्यांच्या शाळा बंदनंतर आता पालकांचे मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी लीड या शैक्षणिक संस्थेमार्फत सर्वेक्षण घेण्यात आले. शाळा लवकरात लवकर पुन्हा सुरू झाल्या तरच मुलांचे शिक्षण पुन्हा सुरळीत होऊ शकते, अशी मते पालकांनी मांडली आहेत.
शाळा सुरू झाल्यानंतर मुलांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन पालकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला अधिक प्राधान्य दिले आहे. मेट्रो शहरांमधील ५५ टक्के पालकांनी सोशल डिस्टन्सिंगला तर ५४ पालकांनी हेल्थकेअर सुविधांना प्राधान्य दिले आहे. नॉन-मेट्रो शहरांमधील ५२ टक्के पालकांनी क्रीडा व सोशल डिस्टन्सिंगला समान महत्त्व दिले. शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहूनच मुलांमध्ये उत्तम सामाजिक भान, बांधिलकी, संवादकौशल्य अशा गुणांना प्रोत्साहन मिळेल, असे मत ६३ टक्के पालकांनी व्यक्त केले आहे.
नॉन-मेट्रो शहरांमधील फक्त ४० टक्के पालक म्हणाले की त्यांची मुले वैयक्तिक संगणकावर शिक्षण घेतात, तिथेच मेट्रो शहरांमधील ६० टक्के पालकांनी सांगितले की त्यांची मुले कॉम्प्युटर/ लॅपटॉपवर शिक्षण घेत आहेत. नॉन-मेट्रो शहरांमधील बहुतांश विद्यार्थी स्मार्टफोन्सच्या माध्यमातून शिकत असल्याने या पालकांच्या मनातील चिंतेमध्ये अधिक वाढ झाली असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
कोट
मागील दीड वर्षाहून अधिक काळात शाळा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारचे नुकसान झाले आहे. स्मार्टफोन, इंटरनेट खर्च यांच्या अनुपलब्धतेमुळे अनेक अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी, तर शिक्षण प्रवाहाबाहेर फेकले गेले आहेत. आवश्यक खबरदारी आणि सुरक्षाविषयक उपाययोजना करूनच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठविण्याची तयारी आता करायला हवी.
- सुमित मेहता, सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, लीड