Join us

अकरावीच्या विशेष फेरीसाठी ६७,५०४ अर्ज

By admin | Published: August 10, 2016 3:18 AM

अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष आॅनलाइन प्रवेश फेरीसाठी दोन दिवसांत एकूण ६७ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती आहे.

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष आॅनलाइन प्रवेश फेरीसाठी दोन दिवसांत एकूण ६७ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती आहे. दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही अखेरची संधी असून गुरूवारी, ११ आॅगस्ट रोजी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर होईल. तरी मोठ्या संख्येने महाविद्यालय बदलासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याने गुणवत्ता यादीनंतर पुन्हा गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याआधी अकरावीच्या चार गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या होत्या. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना चार गुणवत्ता यादीनंतर मेसेज पाठवून प्रवेशाची संधी देण्यात आली. तर अर्धवट अर्ज भरल्याने किंवा अन्य कारणास्तव आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठीही एक विशेष गुणवत्ता यादी जाहीर केली. यामध्ये आॅफलाइनच्या प्रवेशासाठी रखडलेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइनच्या माध्यमातूनच प्रवेश घ्यावे लागले. त्यानंतर आत्ता विशेष फेरी राबविणार असून एकूण तीन गुणवत्ता यादी जाहीर होणार आहेत.अकरावी प्रवेशाच्या एकूण सहा फेऱ्या पार पडल्यानंतरही विशेष फेरीसाठी ६७ हजार ५०४ प्रवेश अर्ज आले आहेत. आॅनलाइन प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थी असंतुष्ट आहे. विशेष फेरीसाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवारी संपली असून गुरूवारी पहिली विशेष यादी जाहीर होणार आहे. या यादीत मनपसंत महाविद्यालयाचे नाव जाहीर झाल्यास, संबंधित विद्यार्थ्यांना शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसांत प्रवेश निश्चित करायचा आहे. (प्रतिनिधी)