पदवीधर मतदारसंघातून ६८ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:17 AM2018-03-15T02:17:18+5:302018-03-15T02:17:18+5:30
मुंबई विद्यापीठाच्या अभिसभेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ १० जागांसाठी तब्बल ६८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अभिसभेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ १० जागांसाठी तब्बल ६८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे अडीच वर्षांनंतर होणारी ही लढत चुरशीची ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: खुल्या गटातील पाच जागांसाठी एकूण ३६ उमेदवार आमनेसामने असतील. विद्यापीठाने बुधवारी निवडणुकीची अंतिम यादी जाहीर केली.
गत निवडणुकीत युवा सेनेने एकतर्फी मते मिळवत १० पैकी ८ जागांवर सरशी साधली होती. मात्र यंदा युवासेनेला कडवी झुंज देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कंबर कसली आहे. विद्यापीठाने बुधवारी पात्र अर्जांची अंतिम यादी जाहीर केल्यानंतर थेट प्रचाराला सुरूवात झाली आहे.
या निवडणुकीसाठीचे मत २५ मार्च रोजी होणार असून २७ मार्चला मतमोजणी असेल. यंदा निवडणुकीत ६२ हजार ५५९ मतदार मतदान करतील. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीत खुल्या गटात ३६, अनुसुचित जाती प्रवर्गातून ११, महिला प्रवर्गातून ६, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून ७ आणि अनुसूचित जमाती व डीटीएनटी प्रवर्गातून प्रत्येकी चार उमेदवार रिंगणात असतील.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुधाकर तांबोळी आणि परशुराम तपासे यांनी अर्ज मागे घेतल्याने युवा सेनेचा मार्ग मोकळा मानला जात होता. मात्र युवा सेनेचे साईनाथ दुर्गे यांचा अर्ज ठरला बाद ठरल्याने युवासेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यात मनविसेच्या संतोष गांगुर्डे व संतोष धोत्रे यांच्या उमेदवारी अर्जाने निवडणुकीत काहीशी रंगत बाकी असल्याची चर्चा आहे.