६८ उमेदवार एमपीएससीत कायमचे ब्लॅकलिस्ट; गैरप्रकारांत सहभागी झाल्याने कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 06:34 AM2022-11-01T06:34:01+5:302022-11-01T06:34:09+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न, मोबाइलचा वापर, तोतयागिरीचा प्रयत्न किंवा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या ६८ उमेदवारांना आयोगाने काळ्या यादीत टाकले असून, त्यांना पुढील स्पर्धा परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित केले आहे. काळ्या यादीतील या विद्यार्थ्यांची नावे आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्य आहेत. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये आयोग परीक्षा घेतो असतो. मात्र, काही उमेदवार वेगवेगळ्या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांत गैरमार्ग अवलंबतात आणि दोषी आढळतात.
अशा उमेदवारांवर आयोगाकडून २०११ पासून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, उमेदवारांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर कारवाईचे स्वरूप निश्चित केले जाते. इतके दिवस ही कारवाई आयोगाच्या पातळीवर करण्यात येत होती. मात्र, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आणि परीक्षेत वाढत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालता यावा म्हणून आयोगाने काळ्या यादीत असणाऱ्या ६८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
कारवाई का?
२०११ पासून ऑक्टोबर २०२२ पर्यंत आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न, मोबाइलचा वापर, तोतयागिरीचा प्रयत्न किंवा आयोगाच्या सूचनांचे उमेदवारांनी उल्लंघन केले. २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या कर सहायक (टॅक्स असिस्टंट) या परीक्षेत गैरप्रकार वा कॉपी केली. अशा उमेदवारांची संख्या मोठी. यादीतील पाच उमेदवारांना पुढील ५ वर्षांसाठी, तर बाकी अन्य उमेदवारांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.
महिलांचाही समावेश
आयोगाने जाहीर केलेल्या काळ्या यादीतील उमेदवारांमध्ये आठ महिला उमेदवारांचाही समावेश आहे. आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात आल्यामुळे हे उमेदवार स्पर्धा परीक्षांमधील कोणत्याही पद भरतीला पात्र ठरू शकणार नाहीत.