Join us

आयआयटी मुंबईकडून संशोधन नोंदणीत ६८ टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2021 4:02 AM

पेटंट फाईलिंगमध्ये आघाडीवर; काेराेना काळात समाजोपयोगी संशोधने बाजारातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयआयटी मुंबईकडून यंदाच्या कोरोना काळातही २६२ ...

पेटंट फाईलिंगमध्ये आघाडीवर; काेराेना काळात समाजोपयोगी संशोधने बाजारात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयआयटी मुंबईकडून यंदाच्या कोरोना काळातही २६२ आयपीची (इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी) नोंदणी करण्यात आली असून मागील वर्षीपेक्षा त्यात तब्बल ६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. आयपी म्हणजे आयआयटीमधील विद्यार्थी किंवा प्राध्यापकांकडून बौद्धिक संपदेचा वापर करून संशोधन केलेली नावीन्यपूर्ण व उपयोगी उपकरणे आणि प्रकल्प असतात. मागील वर्षी आयआयटी मुंबईडून १५६ आयपी फाईल करण्यात आले होते.

आयआयटी दिल्लीतही पेटंट फाईलिंगमध्ये २०२० साली वाढ झाली असून, २०१९ मध्ये १४५ असलेली संख्या २०२० मध्ये १५४ वर पोहोचली आहे. आयआयटी मद्रासच्या २०२० मधील पेटंटची संख्या १८४ असून, २०१९ मध्ये ती १९० इतकी होती. आयआयटी कानपूर आणि आयआयटी खरगपूर येथील संख्या अनुक्रमे ६५, ७० आणि २६ इतकी असल्याची माहिती मिळाली आहे. या लॉकडाऊन काळात संशोधनाच्या पेटंट फाईलिंगसाठी लागणारा पत्रव्यवहार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याने आणि त्यांना बाजारात उपलब्ध होण्यासाठी आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मिळाल्याने पेटंट फाईलिंग करता आले. परिणामी, आवश्यक काेराेना उपकरणे, साधने बाजारात लोकांच्या उपयोगासाठी आणता आल्याची माहिती आयआयटीने दिली.

* १६३ पेटंट म्हणून नोंदणीकृत

लॉकडाऊन काळाचा वापर करीत आयआयटी मुंबईमधील विद्यार्थी, प्राध्यापकांनी जे २६२ आयपी फाईल केले आहेत त्यामधील १६३ पेटंट म्हणून नोंदणीकृत झालेली संशोधने आहेत. पेटंट फाईलिंगमध्ये मागील वर्षीपेक्षा ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आयआयटीकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या ३० टक्क्यांमध्ये १५ टक्के संशोधने ही काेराेना संदर्भातील उपचार व उपकरणांशी संबंधित आहेत.

...............................