मुंबई : राज्यात सीईटी सेलकडून बी.पी.एड., एम.पी.एड. आणि एम.एड. अभ्यासक्रमासाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया २४ जून ते १० आॅक्टोबर दरम्यान राबविण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने अनेक महाविद्यालयांतील या अभ्यासक्रमांसाठीच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. विशेषत: एम.एड. अभ्यासक्रमाच्या फक्त ९६५ जागांवर प्रवेश निश्चिती झाली असून राज्यातील २०३० म्हणजे तब्बल ६८ टक्के जागा रिक्त आहेत. याचप्रमाणे एमपीएड अभ्यासक्रमाच्या १५ टक्के म्हणजे १४१ तर बीपीएड अभ्यासक्रमाच्या ३४.८२ टक्के जागा राज्यभरातील महाविद्यालयांत रिक्त आहेत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता वाढीव मुदत देऊन जादा फेरी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे.या अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेशासाठी २५ नोव्हेंबरपासून जादा फेरी घेण्यात येत असून ती २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. यासंदर्भातील नोटीस आणि प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.आतापर्यंत कुठेही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फेरी राबविण्यात येत असून या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयांची असेल, असे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र घेण्यात येणाऱ्या या फेरीनंतर रिक्त राहणाºया जागांवर कोणतीही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार नाही आणि त्या रिक्तच राहतील, असेही सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.बीपीएडची परिस्थिती समाधानकारकएम.एड. अभ्यासक्रमाच्या तुलनेत एम.पी.एड. आणि बी.पी.एड.च्या शेवटच्या फेरीपर्यंत ३,१६१ प्रवेश निश्चित झाले असून ३४ टक्के जागा रिक्त आहेत, तर एमपीएडचे १४१ प्रवेश निश्चित झाले असून १५ टक्के जागा रिक्त आहेत.
एमएड अभ्यासक्रमाच्या ६८ टक्के जागा रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 7:20 AM