Join us

प्रथम वर्ष पदवीच्या ६८ हजार जागा रिक्त

By admin | Published: July 03, 2014 2:15 AM

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये ६८ हजार जागा रिक्त राहिल्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत वाढविण्यात आली आहे

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये ६८ हजार जागा रिक्त राहिल्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यापीठाची आॅनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी आणि महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.बारावी निकालानंतर विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे आॅनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेनंतर महाविद्यालयांनी गुणवत्ता याद्या जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी पर्यायी अभ्यासक्रमांकडे धाव घेतल्याने अनेक महाविद्यालयात सुमारे ६८ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागा त्वरित भरण्यात याव्यात, असे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे.बारावीनंतर विद्यार्थी मेडिकल, इंजिनीअरिंगकडे मोठ्या संख्येने जाऊ लागले आहेत. त्यामुळे प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहत आहेत. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने जागा रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. या रिक्त महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत दुपारी १२ वाजेपर्यंत प्रवेश द्यावा, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ३० जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. (प्रतिनिधी)