Join us  

मुंबईच्या ओढीमुळे ६८४ कोटींंची फसवणूक करणारा ठग जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या ओढीमुळे ६८४ कोटींंची फसवणूक करणारा फिनॉमिनल ग्रुप ऑफ कंपनीचा अध्यक्ष नंदलाल केसर सिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईच्या ओढीमुळे ६८४ कोटींंची फसवणूक करणारा फिनॉमिनल ग्रुप ऑफ कंपनीचा अध्यक्ष नंदलाल केसर सिंग अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. विविध योजनांमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली त्याने केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रासह विविध ठिकाणी फसवणूक केली आहे.

मूळचा नेपाळचा रहिवासी असलेला सिंग याने फिनॉमिनल हाउसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड, फिनॉमिनल प्लांटेशन लिमिटेड आणि फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस नावाच्या कंपन्या उघडून लोकांना पैसे गुंतविण्यास सांगून ६८४ कोटींचा गंडा घातला. सिंगने भारतात विविध राज्यांत त्याचे दोन सिस्टीम मार्केटिंग जाळे वाढवले होते. केरळ राज्यात हॉस्पिटल उघडले होते. तेथे पैशाच्या कारणांवरून झालेल्या वादाप्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढे लोकांचे पैसे थकविल्यामुळे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. केरळ पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. २०१८ पासून तो फरार होता.

अमेरिका, लंडनमध्ये तो ओळख लपवून राहत होता. त्यानंतर तो नेपाळमध्ये राहण्यास गेला. त्याला मुंबईची ओढ होती. याच ओढीत तो मार्च २०२१ मध्ये कुटुंबीयांसह भारतात आला. दिल्लीनंतर मुंबईमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये बुकिंगदेखील पत्नी आशा सोनारच्या नावावर करत होता. २२ ऑगस्ट रोजी तो नरिमन पॉइंट येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-७ला मिळाली. त्यानुसार तपास पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक आयुक्त नितीन अलकनुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोगसिद्ध ओलेकर आणि तपास पथकाने ही कारवाई केली आहे.