बांधकाम व्यावसायिक अपहरण प्रकरणात मध्यप्रदेशमधून सहावा आरोपी अटक
By मनीषा म्हात्रे | Published: December 4, 2023 05:43 PM2023-12-04T17:43:19+5:302023-12-04T17:44:02+5:30
माझगाव परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय व्यावसायिकाच्या तक्रारीवरून भायखळा पोलिसांनी अपहरणासह खंडणीचा गुन्हा नोंदवला.
मुंबई : बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून १० कोटींची मागणी करणाऱ्या गँगस्टर इलियाज बाचकानासह पाच जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आणखीन एका आरोपीला मध्यप्रदेश मधून अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींची संख्या सहावर पोहचली आहे.
माझगाव परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय व्यावसायिकाच्या तक्रारीवरून भायखळा पोलिसांनी अपहरणासह खंडणीचा गुन्हा नोंदवला. तक्रारीनुसार, वडील बांधकाम व्यावसायिक तर आई डॉकटर आहेत. ते फूड प्रॉडक्शन्सचा व्यवसाय करतात. २३ नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास व्यावसायिक भागीदाराने माझगाव सर्कल येथे बोलावून घेत, वडीलांच्या अपहरणाची माहिती सांगताच त्यांना धक्का बसला. माझगाव सर्कल येथून त्यांचे अपहरण करत १० कोटींची मागणी करण्यात आली होती. भायखळा पोलिसांसह गुन्हे शाखेने तपास सुरू केला. अखेर, ते वाहन मानखुर्द च्या दिशेने जाताना दिसले. तोच धागा पकडून तांत्रिक पुराव्याच्या मदतीने खंडणी विरोधी पथकाने पाठलाग करत आरोपी पर्यंत पोहचले.
आरोपींनी मानखुर्द च्या एका झोपडीत व्यावसायिकाला हात पाय बांधून कोंडून ठेवले होते. त्यांना मारहाणही करण्यात आली. गुन्हे शाखेने शिताफीने त्यांची सुखरूप सुटका करत बचकानाला अटक केली आहे. यामध्ये भायखळा पोलिसांनी दोन तर गुन्हे शाखेने तीन असे एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात मध्यप्रदेशमधून मजहर शाकिर उर्फ शानु शहा (२२) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.