Join us

बीडीडी चाळींसाठी ७ ते १० एफएसआय! १९ हजार घरे

By अतुल कुलकर्णी | Published: February 11, 2018 5:43 AM

नायगाव, ना.म. जोशी मार्ग व वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आराखडा पूर्ण झाला असून, मूळ रहिवाशांसाठी १५,९८६ व विक्रीसाठी ३,७२० अशी १९,७०६ घरे बांधण्यात येणार आहेत. यासाठी नायगाव येथे ९, ना.म. जोशी मार्गावर ७.७६ व वरळीत ९.८१ एफएसआय दिला जाणार आहे.

मुंबई : नायगाव, ना.म. जोशी मार्ग व वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आराखडा पूर्ण झाला असून, मूळ रहिवाशांसाठी १५,९८६ व विक्रीसाठी ३,७२० अशी १९,७०६ घरे बांधण्यात येणार आहेत. यासाठी नायगाव येथे ९, ना.म. जोशी मार्गावर ७.७६ व वरळीत ९.८१ एफएसआय दिला जाणार आहे.एवढा एफएसआय वापरल्यास रस्ते, पाणी, ड्रेनेजवर येणा-या ताणाविषयी म्हाडा काहीच बोलत नाही. या भागात मंदीमध्ये इतकी घरे झाल्यास त्यांच्या किमती कमी होतील, असा म्हाडाचा दावा आहे. प्रकल्प आकाराला येण्यासाठी ७ वर्षे लागणार आहेत.तिन्ही ठिकाणी हजारो घरे होतील. पण बाहेरील रस्ते आहे तेवढेच राहतील. पाणी, ड्रेनेजच्या सुविधा आहेत तेवढ्याच राहतील. त्याच्या नियोजनाविषयी विचारता, बाहेरील नियोजनाचा प्रश्न मुंबईत सर्वत्र आहे, असे म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या कामांसाठी आंतरराष्टÑीय निविदा मागविल्या आहेत. आज घरांचे भाव कमी होत नसले तरी मोठ्या प्रमाणावर घरे बांधून झाल्यास त्यांच्या किमती कमी होतील, असेही ते म्हणाले. बिल्डरांना विक्रीयोग्य अधिक क्षेत्र देऊन सरकारने बिल्डरांचे हित पाहिले आहे, असा आक्षेप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. म्हाडाच्या तिन्ही प्रकल्पांत लोकांना ५०० स्वे. फुटांचे घर मिळेल. पण त्या बदल्यात बिल्डरांचाच फायदा अधिक होईल, असे ते म्हणाले. घनकच-यामुळे मुंबईतील बांधकाम उच्च न्यायालयाने थांबवले आहे. असे असताना इतक्या घरांत राहणा-यांच्या ड्रेनेज, पाण्याच्या सोयीकडे कोण लक्ष देणार, असा सवाल करून चव्हाण म्हणाले की, हे प्रकल्प पूर्ण होण्यास १० वर्षे लागतील. त्या वेळी तेथे काय स्थिती असेल याचा विचार झालेला नाही. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याशी संपर्क साधला; पण ते उपलब्ध झाले नाहीत.व्यावसायिक चित्र (चौ. मीटरमध्ये) (वरळी-बीडीडी) रहिवाशांसाठी - ५,२३,९८९, बिल्डरांसाठी - ४,६८,७०८,(ना. म. जोशी मार्ग) रहिवाशांसाठी-१,३७,८०१.९३, बिल्डरांसाठी - १,०३,३५१.४५, (नायगाव) रहिवाशांसाठी -१,८६,६४२.३२,बिल्डरांसाठी-१,५८,४१२.७३

टॅग्स :मुंबई