ठाणे : गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांना महाराष्ट्रात बंदी असतानाही छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. सात वर्षांत राज्यात एफडीएने १८५ कोटी ८९ लाखांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तर, पाच हजार ४३४ प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत.गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदीची नवीन अधिसूचना २० जुलैपासून लागू झाली असून कोकण विभागातील रायगड येथे गोदाम आणि रत्नागिरी येथील कारखाना सील करून लाखोंचा मुद्देमाल जप्त करून एफआयआर दाखल केल्याची माहिती एफडीए सूत्रांनी दिली.तंबाखू आणि निकोटिन या घटक पदार्थांना प्रतिबंध आहे. १९ जुलै २०१२ रोजी याबाबत पहिली अधिसूचना महाराष्ट्रात जारी झाली. त्यानंतरही राज्यात इतर गोष्टींबरोबर गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा ट्रक, वाहने व इतर परिवहन सुविधांतर्गत साठवून ठेवल्याचे आढळून आले.
त्यानुसार, राज्यात २०१२-१३ मध्ये २० कोटी ७४ लाखांचा साठा जप्त केला. २०१३-१४ मध्ये १५.६६ कोटी २०१४-१५ मध्ये १७.५३ कोटी, २०१५-१६ मध्ये २४.३७ कोटी, २०१६-१७ मध्ये २२.९८ कोटी, २०१७-१८ मध्ये ३९.८४ कोटी आणि २०१८-१९ मध्ये ४४.७७ कोटी असा एक अब्ज ८५ कोटी ८९ लाखांचा साठा जप्त केला आहे. प्रशासनाकडून नियमित कारवाई सुरू आहे. त्याच प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या १९९ वाहनांवर कायदेशीर कारवाई केलेली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ठाणे एफडीएने २५ जुलैला रायगड येथे टाकलेल्या छाप्यात ६३ हजार ५८८ रुपयांचा गुटखा आणि तंबाखू जप्त करत ते गोदाम सील केले.
याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ही कारवाई अन्न निरीक्षक एस.एन. जगताप यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कामथे येथे गुटखा तयार केला जात असल्याची माहिती मिळाल्यावर तेथे छापा घालून तो कारखाना सील केला. यावेळी तेथून एक लाख ३५ हजार ३०० रुपयांचा गुटखा, एक लाख २० हजारांचा कच्चा माल आणि चार लाख ४५ हजार ५०० रुपयांची मशीन मिळून आली. ही कारवाई अन्न निरीक्षक मारुती बामभाले यांनी पोलीस उपअधीक्षक सुनील गुरव यांच्या मदतीने केल्याची माहिती कोकण विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.