उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:55+5:302021-05-29T04:06:55+5:30
अनेक जण अडकल्याची भीती : बचावकार्य सुरू सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. २ परिसरातील ...
अनेक जण अडकल्याची भीती : बचावकार्य सुरू
सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. २ परिसरातील साईशक्ती इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर कोसळल्याने, सात जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे. महानगरपालिकेच्या पथकासह अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे.
उल्हासनगरात १५ दिवसांपूर्वी मोहिनी इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू, तर १० जण जखमी झाले होते. त्यानंतर दोन दिवसांतच पुन्हा दोन इमारतींचे स्लॅब व प्लास्टर पडल्याने, त्या इमारती सील केल्या हाेत्या. अशातच कॅम्प नं. २ परिसरातील साईशक्ती इमारतीचा चौथा मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. ही इमारत चार मजली असून, शेवटच्या मजल्यावरील एका फ्लॅटचा स्लॅब सर्वांत आधी कोसळला. त्याच्या वजनामुळे या फ्लॅटखालील सर्वच मजल्यांवरील फ्लॅटचे स्लॅब पत्त्यासारखे कोसळून स्लॅबच्या आकाराचा उभा बोगदाच तयार झाला. स्लॅबचा ढिगारा काढण्याचे काम सुरू असून रात्री उशिरापर्यंत ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
इमारतीमध्ये एकूण २९ फ्लॅट असून, येथील सर्व रहिवाशांची राहण्याची व्यवस्था थारासिंग दरबार येथे करण्यात येत असल्याचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगितले. परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र अशा परिस्थितीतही अग्निशमन दलाचे जवान, पोलीस व महापालिका कर्मचारी अडकलेल्या नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढत आहेत.