सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सात लाखांची लाचखोरी; सीबीआयकडून गुन्हा दाखल
By मनोज गडनीस | Published: October 5, 2023 05:56 PM2023-10-05T17:56:32+5:302023-10-05T17:56:45+5:30
या छाप्यांदरम्यान, काही कागदपत्रे व काही पुरावे सापडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
मुंबई - सिनेमाच्या प्रदर्शनासाठी आवश्यक सेन्सॉर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईत कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांनी अन्य लोकांसोबत संगनमत करत सात लाख रुपयांची लाचखोरी केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तामिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेता विशाल याच्या मार्क अँटोनी या सिनेमाच्या हिंदी भाषेतील सिनेमाला हे प्रमाणपत्र देण्यासाठी ही लाचखोरी झाली. त्यानंतर, अभिनेता विशाल याने या संदर्भात त्याच्या सोशल मीडियावरून उघड भाष्य केले होते तसेच या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. यानंतर, हालचालींना वेग आला. या प्रकरणी गुरुवारी सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल केल्यानंतर चार ठिकाणी छापेमारी केली. या छाप्यांदरम्यान, काही कागदपत्रे व काही पुरावे सापडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांची नावे व किती अधिकारी आहेत ही संख्या सीबीआयने जाहीर केलेली नाहीत. तर, या अधिकाऱ्यांनी ज्यांच्यासोबत संगनमत केले त्यामध्ये मर्लिन मेनगा, जीजा रामदास, राजन एम यांचा समावेश आहे. अभिनेता विशाल याने या प्रकरणाची वाच्यता केल्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या होत्या. माहिती व प्रसारण खात्याच्या अतिरिक्त सचिव नीरजा सेकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते.