Join us  

मुंबईत दरमहा वाटले जातात सात लाख मोफत कंडोम, पुरवठा बंद झाल्याने मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी स्वत: करणार खरेदी

By संतोष आंधळे | Published: December 01, 2023 11:24 AM

Mumbai: एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यासाठी ‘कंडोम’ ही यशस्वी उपाययोजना आहे. त्यासाठी मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटीतर्फे मुंबईत सामाजिक संस्था, समुपदेशन केंद्रांना दरमहा सात लाख मोफत कंडोमचे वाटप केले जाते.

- संतोष आंधळेमुंबई - एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यासाठी ‘कंडोम’ ही यशस्वी उपाययोजना आहे. त्यासाठी मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटीतर्फे मुंबईत सामाजिक संस्था, समुपदेशन केंद्रांना दरमहा सात लाख मोफत कंडोमचे वाटप केले जाते. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनतर्फे (नाको) सोसायटीला कंडोमचा पुरवठा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात पुरवठा नाकोतर्फे होणार नसल्याने सोसायटी स्वखर्चाने कंडोमची खरेदी करेल. सुरक्षित संबंधांसाठी कंडोम वापरण्यासाठी मोठी जनजगृती मोहीम हाती घेण्यात आली. 

राज्यात तुटवडा राज्यभरात दरवर्षी तीन कोटी २० लाख कंडोमची आवश्यकता भासते. नाकोतर्फे कंडोमची खरेदी करून ती राज्यांना वितरित केली जातात. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून नाकोतर्फे पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे राज्यभर मोफत कंडोमचा तुटवडा भासत आहे. 

कॉलेज गॅदरिंगमध्ये जनजागृती कॉलेजच्या तरुण मुलांना या आजाराविषयी शास्त्रीय माहिती मिळावी म्हणून सोसायटीतर्फे कॉलेजांना संपर्क करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोसायटीचे समुपदेशन अधिकारी कॉलेजच्या गॅदरिंगला जाऊन या विषयाची जनजागृती करतील.  १५० महाविद्यालयांना यासाठी संपर्क करण्यात येणार आहे. काही महिन्यापूर्वी झेवियर्स महाविद्यालयात झालेल्या मल्हार या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवात सोसायटीतर्फे जाऊन एचआयव्हीच्या दुष्परिणामाची माहिती तसेच सुरक्षित संबंध ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती देण्यात आली होती. 

मुंबईत कंडोमचा तुटवडा नाहीमुंबईला दरमहा सर्वसाधारणपणे ६-७ लाख कंडोमची गरज लागते. आतापर्यत हा पुरवठा नाकोतर्फे करण्यात येत होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये काही कारणास्तव हा पुरवठा होणार नसल्याचे नाकोतर्फे कळविण्यात आले. त्यामुळे सात लाख कंडोमची खरेदी करावी लागणार आहे. आजही आमच्याकडे आठ दिवस पुरेल इतका कंडोमचा साठा आहे. कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही.- डॉ. विजयकुमार करंजकर, अतिरिक्त प्रकल्प अधिकारी, मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी

सोसायटीतर्फे एवढे झाले वाटप एप्रिल : ५,६८,३२०  मे : ८,०२,८००  जून : ५,९९,२८०  जुलै : ७,९५,१३२ ऑगस्ट : ७,२३,१२०  सप्टेंबर : ६,१०,५६० ऑक्टोबर : ६,६८,८८६ 

टॅग्स :मुंबई