दुसऱ्याच्या कागदपत्रांवर काढले ७ लाखांचे लोन; फायनान्स कंपनीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 02:01 PM2024-04-10T14:01:11+5:302024-04-10T14:02:01+5:30
गोरेगावच्या फायनान्स कंपनीची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सात लाखांचे पर्सनल लोन काढून एका फायनान्स कंपनीची फसवणूक करत पळून गेलेल्या भामट्याला वनराई पोलिसांनी अटक केली. रंजन भाटिया असे त्याचे त्याचे नाव आहे. अन्य व्यक्तीच्या शासकीय कागदपत्रांचा गैरवापर करून त्याने हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.
रवी मोरे (वय ३०, रा. गोरेगाव) हा खासगी फायनान्स कंपनीत मॅनेजर आहे. या कंपनीचे एक मुख्य कार्यालय गोरेगाव येथील विरवानी इंडस्ट्रियल इस्टेट, बिझनेस पार्कमध्ये आहे. १९ मार्च २०२२ रोजी त्याच्या कंपनीत भाटिया याने वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करत पॅनकार्ड, आधारकार्ड, अपॉइंटमेंट लेटर, पॉलिसी कागदपत्रे सादर केले. त्यानुसार त्याला ७ लाख रुपयांचे कर्ज मिळाले. कर्जाचे हप्ते भरणे बंद केल्यानंतर कर्जवसुली अधिकारी गुरुचरण सिंग यांच्या पंजाब येथील पत्त्यावर चौकशीसाठी गेले.
दीड महिन्याच्या शोधानंतर एकास अटक
घरी गेल्यावर मुलगा सुरिंदरकुमार भाटिया हा पंजाबच्या मोहाली येथे नोकरीस असून, त्याने त्यांच्या कंपनीतून कुठलेही पर्सनल लोन घेतले नसल्याचे आईने सांगितले.
चौकशीत रंजनने सुरिंदरकुमार भाटिया या नावाने बोगस दस्तावेज सादर करून कर्ज घेतल्याचे उघडकीस आले.
कंपनीने पवई पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
जवळपास दीड महिने शोध घेतल्यावर रंजनला अटक करण्यात पोलिसांना यश आले.