Join us

जोगेश्वरीतील ७ पोलिसांना डेंग्यू

By admin | Published: September 15, 2016 2:40 AM

आॅन ड्युटी २४ तास राबणारे पोलीस आता डेंग्यूचे शिकार बनल्याची घटना जोगेश्वरीत घडली. यामध्ये जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांसह सात

मुंबई : आॅन ड्युटी २४ तास राबणारे पोलीस आता डेंग्यूचे शिकार बनल्याची घटना जोगेश्वरीत घडली. यामध्ये जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांसह सात जण डेंग्यूच्या तापाने फणफणत आहेत. पोलीस ठाण्याच्या ताडपत्रीतील पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. पालिकेने यापूर्वीच त्यांना याबाबत नोटीस बजावली होती. जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या आवारातच मोठा नाला आहे. शिवाय त्याच्या समोरच इमारतीच्या बांधकामासाठी मोठा खड्डा खणण्यात आला आहे. परिसरातील अस्वच्छ वातावरणामुळे येथील पोलिसांना विविध आजारांना तोंड द्यावे लागते. अशातच पोलीस ठाण्याच्या ताडपत्रीमध्ये डेंग्यूच्या अळ्यांमुळे त्यांना डेंग्यूच्या आजाराशी सामना करण्याची वेळ ओढावली आहे. यामध्ये जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र निकम यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पूजा शाह, मंगेश गोंथला, अभिजित थोरात यांच्यासह अंमलदार महेश चौधरी, योगेश गरूड, महेंद्र जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कांदिवलीच्या विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ुजोगेश्वरीपाठोपाठ पायधुनी पोलिस ठाण्यातील पोलिसांनाही डेंगूची लागण झाल्याचे समोर आले आहे. पी.एस.आय कोळेकर यांना डेंगूची लागण झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (प्रतिनिधी)