Join us

पालघरच्या ७ तालुक्यांचे सर्वेक्षण

By admin | Published: November 20, 2014 11:53 PM

राज्य आणि केंद्र शासनाने नरेगा आणि इतर योजनांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे

पंकज रोडेकर , ठाणेराज्य आणि केंद्र शासनाने नरेगा आणि इतर योजनांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे मात्र, त्या योजना मागास जात प्रवर्गातील नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना रोजगाराची संधी मिळत नाही. या संदर्भात पालघर जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील नागरिकांचे लवकरच सर्वेक्षण करण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोजगार हमी योजना विभागाने घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये लेबर बजेटचे नियोजन करण्यात यावे, असा अध्यादेश नुकताच राज्य शासनाने काढला आहे. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती-जमाती, दारिद्रयरेषेखालील कुटुंबे, स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे, अपंग कुटुंबप्रमुख यांना रोजगाराची संधी मिळावी, असे म्हटले आहे. तसेच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे किंवा नाही, कृषी कर्जमाफी मिळाली आहे का, नरेगाच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे किंवा नाही, याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांना रोजगाराची संधी मिळाली नाही, अशा कुटुंबांना शेतजमिनीवर, तालुक्यातील प्रकल्पांवर रोजगाराची संधी देण्यात येणार आहे. तसेच हे सर्वेक्षण कसे करावे, याबाबत नुकतेच नागपूर येथे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.त्या वेळी जिल्ह्यातील डहाणू, मोखाडा, विक्रमगड, वाडा, जव्हार, तलासरी, पालघर या तालुक्यांची निवड करण्यात आली असून येथे लवकरच सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यास सांगितले आहे.