Join us

जागा ७ हजार, अर्ज दहा हजार; मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सोडत काढून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 10:42 AM

मनपाच्या २२ शाळांमधील सात हजाराहून अधिक जागांकरिता आतापर्यंत सुमारे १० हजार ६०० अर्ज आले आहेत.

मुंबई : महापालिकेच्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई आणि आयबी शिक्षण मंडळ संलग्नित २२ शाळांमधील सात हजाराहून अधिक जागांकरिता आतापर्यंत सुमारे १० हजार ६०० अर्ज आले आहेत. उपलब्ध जागांपेक्षा अर्ज अधिक आल्याने सोडत काढून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.  गेले १५ दिवस ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. सोमवारी ही मुदत संपली. साेमवारी सायंकाळपर्यंत पालिकेकडे एकूण १०,६०० अर्ज आले होते.

सीबीएसई, आयसीएसईसारख्या केंद्रीय शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मुलांना शिकवायचे असते, पण फी परवडत नाही, अशा पालकांकडून या शाळांना गेली तीन वर्षे चांगला प्रतिसाद लाभतो आहे. 

सीबीएसईच्या शाळा अधिक :

२२ शाळांपैकी एक आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई असून, उर्वरित सीबीएसईच्या शाळा आहेत. सीबीएसई व आयसीएसई मंडळाच्या शाळांमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ४० आहे, तर आयजीएसई व आयबीची ३० आहे.

...तरच लॉटरीचा विचार 

घाटकोपरच्या सीबीएसईतील नर्सरीच्या ६८ जागांकरिता १४० अर्ज आले आहेत. यंदाही शाळांमधील उपलब्ध जागांच्या तुलनेत दुप्पट अर्ज आले आहेत. अर्ज अधिक असल्यास लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाईल, असे पालिकेचे निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले.

नर्सरीपासून सहावीपर्यंतचे प्रवेश :

 नर्सरी ते सहावी वर्गाकरिता हे प्रवेश होतील.  सर्व वर्गांच्या मिळून एकूण ७०९० जागा उपलब्ध आहेत. 

 यापैकी नव्याने मान्यता मिळालेल्या ए, जीएस, एमई-१, पीएन आणि एस वॉर्डमधील पाच शाळांमध्ये नर्सरी ते सहावीच्या मिळून प्रत्येकी ६१२ जागांवर प्रवेश केले जाणार आहेत.

सोडत ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पालिका २२ जानेवारीपर्यंत अर्जांची छाननी व पालकांचे समुपदेशन करेल. सोडतीसाठी विद्यार्थ्यांची यादी २७ जानेवारीला लावली जाईल, तर ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान सोडत काढली जाईल. सॅप प्रणालीचा वापर करून सोडत काढली जाते. निवड झालेल्या पाल्यांची यादी ५ फेब्रुवारीला जाहीर केली जाईल.

टॅग्स :मुंबईनगर पालिका