Join us

मुंबईतून दिवसाला ७ वाहने जाताहेत चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:06 AM

११ महिन्यात अडीच हजार वाहनांची चोरी, अवघ्या ९०० वाहनांचा शोधमुंबईतून दिवसाला ७ वाहने जाताहेत चोरीला११ महिन्यांत अडीच ...

११ महिन्यात अडीच हजार वाहनांची चोरी, अवघ्या ९०० वाहनांचा शोध

मुंबईतून दिवसाला ७ वाहने जाताहेत चोरीला

११ महिन्यांत अडीच हजार वाहनांची चोरी, अवघ्या ९०० वाहनांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात ‘लॉक’ झालेली रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा ‘अनलॉक’ झाल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. गेल्या ११ महिन्यांत मुंबईतून अडीच हजार वाहने चोरीला गेली आहेत. यातील अवघ्या ९०० वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

गेल्या ११ महिन्यांत मुंबईत एकूण ४७ हजार ७५६ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३३ हजार १४७ गुह्यांची नोंद झाली. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या मुख्यत्वेकरून एप्रिल आणि मे महिन्यांत शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरू होताच पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. यात वाहन चोरीत वाढ झाली आहे.

गेल्या ११ महिन्यांत वाहन चोरीचे २ हजार ५१७ गुन्हे पोलीस दफ्तरी नोंद झाले आहेत. यापैकी अवघ्या ९०० वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ८९ ने वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात यात वाढ झाली आहे. या वाहनांत दुचाकींचे प्रमाण अधिक आहे. दिवसाला ६ ते ७ वाहने चोरीला जात असल्याने मुंबईकरांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

......

भंगारात पार्टची विक्री... तर कुठे बनावट क्रमांकाच्या आधारे विक्री

रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळ्या त्यांच्या पार्टची मुंबईसह मुंबईबाहेर विक्री करतात. मुंबईतही बहुतांश गॅरेजमध्ये यांची कमी भावात खरेदी करतात. तर काही जण त्यांना भंगारातील दुचाकींचे इंजीन नंबर लावत त्यांची विक्री करतात. भंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायचे, त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी शोधून त्या दुचाकीची चोरी करायची अशा टोळ्यांवर मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे.

....

९०० गुह्यांची उकल

मुंबईत आतापर्यंत दाखल वाहन चोरीच्या घटनांपैकी ९०० गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात आतापर्यंत वेगवगेळ्या टोळ्यांंची, चोरांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

....

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रस्त्यावरील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच सर्व आस्थापनांबाहेर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. जेणेकरून गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

........