मुंबईत तुरळक ठिकाणी ७० ते १०० मिलीमीटर पाऊस कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 06:11 PM2020-08-13T18:11:42+5:302020-08-13T18:12:00+5:30
पावसाने चांगला जोर पकडला.
मुंबई : गेल्या ४८ तासांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने चांगला जोर पकडला असून, गुरुवारी सकाळी मुंबईत ७० ते १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५.६ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली.
दुपारचे काही क्षण वगळता मुंबईत सकाळी आणि सायंकाळी पावसाची रिपरिप लागून राहिली होती. विशेषत: दुपारी बाराच्या सुमारास पडलेल्या कडक्याच्या ऊन्हानंतर दोन वाजता मात्र पावसाला तुरळक सुरुवात झाली. आणि हाच पाऊस रात्री ऊशिरापर्यंत अधून मधून लागून राहिला होता. पाऊस कोसळत असतानाच एकूण ३० ठिकाणी झाडे पडली. ९ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. आता १४ आणि १५ आॅगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. अधून मधून सोसाटयाचा वारा वाहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, कांदिवली येथील गणेश नगरमधल्या प्लास्टिक कारखान्याला बुधवारी मध्यरात्री १२ वाजता आग लागली. गुरुवारी पहाटे ४ वाजता ही आग अग्निशमन दलामार्फत पुर्णपणे विझविण्यात आली, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.