मुंबई : मुंबईत एकीकडे विजेचा झगमगाट असतानाच दुसरीकडे येथीलच आरेतल्या ७० ते ८० टक्के झोपड्यांना अद्यापही मीटर नसल्याचे चित्र आहे. १९९५ पूर्वी ६ हजार ३२० अशी आरेतील झोपड्यांची नोंद आहे. मात्र २५ वर्ष झाली आणि आता झोपड्याही वाढल्या आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे २ हजारपर्यंतच्या झोपड्यांना पुर्णत: संरक्षण आणि मुलुभूत सेवा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र आरे प्रशासन २ हजार पर्यंतच्या शासकीय निर्णयास मान्य करत नाही. त्यामुळे समस्या दिवसागणिक वाढतच असून, आता किमान येथील झोपड्यांना वीज तरी द्या, असे म्हणणे मांडले जात आहे.
आरे येथील झोपडीधारकांना वीज मीटर बसविण्यासाठी शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाच्या १८ ऑक्टोबर २०१६ च्या शासन परिपत्रकानुसार कोणतेही कायदेशीर निर्बंध नसल्यास अशा जागेत वीज जोडणी देण्यात यावी. तसेच अशा ठिकाणच्या वीज देयकाचा वापर सदरची जागा अधिकृत ठरविण्यासाठी पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही या अटीवर संबधित जागेस वीज जोडणी देण्यात यावी, असे आदेश परिपत्रकात आहेत. तरी या परिपत्रकानुसार आरेमधील झोपडी धारकास वीज मीटर बसविण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जमाती विभागाचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी केली आहे. याबाबतचे पत्रदेखील दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांना दिल्याचे कुमरे यांनी नमुद केले. परिणामी याची दखल प्रशासनाने घ्यावी. येथील झोपड्या असोत किंवा पाडे असतो. त्यांना वीज मीटर मिळाले तर साहजिकच पुढच्या अडचणी दूर होतील, अशी माहिती येथून देण्यात आली.