मुंबई : मुंबई पाेलिसांनी ‘ऑल आउट ऑपरेशन’अंतर्गत विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या शहर व उपनगरातील तब्बल ७० आरोपी, समाजकंटकांना अवघ्या तीन तासांत जेरबंद करण्यात आले. तर रेकॉर्डवरील ३६२ गुन्हेगार तपासण्यात आले. महानगरातील ८६१ हॉटेल्स, लॉजेस तपासण्यात आले.शुक्रवारी रात्री ११ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत राबविलेल्या या मोहिमेत प्रलंबित गुन्हे, आरोपींवर धडक कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणांहून एका रिव्हॉल्व्हरसह २२ हत्यारे जप्त केली. गुन्हेगार व बेकायदा कारवायांविरोधात संपूर्ण मुंबईत आकस्मिकपणे पहिल्यांदाच असे धाडसत्र राबवण्यात आले. पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सूचनेनुसार सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये सर्व विभागाच्या पाचही अप्पर आयुक्तांपासून १३ उपायुक्त आणि सर्व अप्पर आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांनी आपापल्या हद्दीत विविध पथके बनवून कारवाई केली.यावेळी पाहिजे व फरार असलेले ४८ आरोपी, तसेच मुंबईबाहेरील गुन्ह्यांतील २२ आरोपी सापडले. तस्कराकडून एमडी, गांजा, चरस जप्त केले. ९५ ठिकाणी छापे टाकले. तेथून १ रिव्हॉल्व्हरसह २२ तलवारी, सुरे आदी हत्यारे जप्त केली. १५६ जणांना अजामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले.
यापुढेही कारवाई सुरूच राहणारबेकायदा कृत्ये, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ऑल आउट ऑपरेशन राबविले जात आहे. यामध्ये सर्व प्रकारचे गुन्हे, गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल, संवेदनशील ठिकाणी गस्त, नाकाबंदी आदी सर्व कार्यवाही केली जाणार आहे, हे ऑपरेशन या पुढेही वेळोवेळी राबविले जाणार असून कारवाई सुरूच राहणार आहे.- विश्वास नांगरे-पाटील, सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था