लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट मुंबईत आता नियंत्रणात आली आहे. मात्र मागील दोन-तीन महिन्यांमध्ये म्युकरमायकोसिसने आव्हान उभे केले आहे. आतापर्यंत या आजाराने ग्रस्त ८०४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ४३६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७० सक्रिय रुग्ण मुंबईतील आहेत.
डोळे, नाक आणि मेंदूवर हल्ला करणाऱ्या या बुरशीजन्य आजारामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. कोविड काळात उपचार घेताना स्टिरॉईड व टोसिलीझूमॅबच्या अतिवापरामुळे हा आजार संभवतो. यासंदर्भात टास्क फोर्सने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉल अनुसार पालिकेने यंत्रणा उभारून उपचार पद्धती सुरू केली. पालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर आणि खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या आजारावर प्रभावी ठरणारे इंजेक्शन व औषध वापरून रुग्णांना बरे केले जात आहे. तसेच आवश्यकतेनुसार रुग्णाच्या नाक व डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून संसर्ग झालेला भाग काढण्यात येत आहे.