अतिजोखमींच्या आजारामुळे राज्यात कोरोनाचे ७० टक्के मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:11 AM2020-06-12T06:11:54+5:302020-06-12T06:12:20+5:30
काळजी घेणे गरजेचे : अस्थमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह ठरतो घातक
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने ९४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर आतापर्यंत ३ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये ७० टक्के बळी अतिजोखमीच्या आजारांमुळे झाले असून ३० टक्के अन्य मृत्यू आहेत. राज्यात गुरुवारपर्यंत २ हजार ३६० हून अधिक मृत्यू अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांचे झाले आहेत.
कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेले लॉकडाऊन काहीअंशी शिथिल होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्कालीन उपाययोजनांचे नियोजन प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आले आहे. श्वसन संस्थेचे जुने आजार, अस्थमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, वृद्ध व्यक्ती अशा अतिजोखीम अवस्थेतील व्यक्तींचा कोरोना प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असून त्यांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सर्व वयोगटातील लोकांना स्वत:ला विषाणूपासून संरक्षित ठेवण्यासाठी संरक्षणात्मक उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाताची स्वच्छता राखणे व श्वसनासंबंधीचे शिष्टाचार यांचे पालन करणे गरजेचे असल्याचे डॉ. विनय राजमाने यांनी सांगितले.
राज्यातच नव्हे तर जगभरात दहा वर्षांखालील मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे आणि त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. ही दिलासादायक बाब आहे, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.
मुलांसाठी दिलासादायक
दहा वर्षापर्यंतच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यामुळे त्यांना तितकासा संसर्ग होताना दिसत नाही, असे डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले. आतापर्यंत राज्यात दहा वर्षांखालील एकाही रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही. पण, तरीही पालकांनी लहान मुलांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.