कोरोना काळात ७० कोटींचा ऑक्सिजन विरला? ईडी तपासणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 09:00 AM2023-09-10T09:00:40+5:302023-09-10T09:01:32+5:30
कोरोना काळात पालिकेचा निम्माच खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड काळात मुंबई महानगरपालिकेने ऑक्सिजनसाठी १४० कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र, त्यापैकी केवळ ५० टक्केच रक्कम ऑक्सिजनच्या खरेदीसाठी झाली आणि उर्वरित रक्कम लंपास झाल्याचा दावा ईडीतर्फे केला जात आहे. ही रक्कम नेमकी कुठे गेली याचा तपास आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, भायखळा येथील प्राणि संग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या कामात गुंतलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या एका कंत्राटदाराला कोविड काळामध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे काम देण्यात आले होते. या कामाकरिता पालिकेने संबंधित कंपनीला १४० कोटी रुपये दिले होते. मात्र, संबंधित कंत्राटदाराने या पैशांचा अपहार केल्याचा दावा ईडी करीत आहे. या कंत्राटदाराला जेव्हा हे पैसे मिळाले तेव्हा त्याने ते कंत्राट अन्य एका कंपनीला दिले. ही कंपनी केवळ कागदोपत्रीच असल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले.
या कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या कंपनीने दिल्लीस्थित एका कंपनीकडून ऑक्सिजन साठ्याच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली. तसेच, ऑक्सिजनच्या पुरवठ्याची बिले या केवळ कागदावर असलेल्या कंपनीला सादर केली. याची बिले जरी १४० कोटी रुपयांची असली तरी प्रत्यक्षात आलेला ऑक्सिजनचा साठा व माल वाहतुकीची किंमत ही ७० कोटी रुपयांच्या आसपासही नसल्याचे ईडीच्या तपासात दिसून आल्याचे समजते. याच संदर्भात ईडीने नुकतीच या कंत्राटदाराच्या घर तसेच कार्यालयावर छापेमारी केली असता त्याच्याकडून एक कोटी २० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
व्यापक चौकशी होणार
दरम्यान, कोविड केंद्रातील घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी ईडीने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या सुजित पाटकर यांच्याशी संबंधित कंपनीने मनी लॉड्रिंग केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, कोविडच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने केलेल्या व्यवहारांची व्यापक चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.