७0 कुटुंबीयांचा जीव धोक्यात
By admin | Published: August 4, 2015 02:38 AM2015-08-04T02:38:15+5:302015-08-04T02:38:15+5:30
विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगरातील म्हाडाने अतिधोकादायक जाहीर केलेल्या संक्रमण शिबिरातील ७0 कुटुंबीयांचा जीव धोक्यात सापडला आहे
तेजस वाघमारे,मुंबई
विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगरातील म्हाडाने अतिधोकादायक जाहीर केलेल्या संक्रमण शिबिरातील ७0 कुटुंबीयांचा जीव धोक्यात सापडला आहे. पात्र-अपात्रतेच्या फेऱ्यात अडकलेल्या या रहिवाशांचे अद्यापर्यंत पुनर्वसन न झाल्याने हे कुटुंबीय मृत्यूच्या दाढेत राहत आहेत. पावसाळ्यात येथे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
म्हाडामार्फत गतवर्षी पावसाळापूर्व करण्यात आलेल्या धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणामध्ये कन्नमवार नगरातील १२८, १२९, १३३, १३४ क्रमांकांच्या इमारती अतिधोकादायक आढळून आल्या. म्हाडाने गतवर्षी या इमारती अतिधोकादायक जाहीर करत यामधील रहिवाशांनी पर्यायी ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला रहिवासी प्रतिसाद देत नसल्याने म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने काही कुटुंबीयांना पर्यायी जागेत स्थलांतरित केले. मात्र, अद्यापही या इमारतींमधील सुमारे ७0 कुटुंबीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
पंधरा वर्षांपासून वास्तव्य करत असलेल्या या कुटुंबीयांच्या पात्रतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या कुटुंबीयांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. इमारत अतिधोकादायक असल्याने म्हाडाने दोन महिन्यांपूर्वी या इमारतींमधील रहिवाशांनी पर्यायी ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन केले होते. परंतु या आवाहनाला अद्याप रहिवाशांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे भविष्यात अनुचित प्रकार घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
म्हाडाकडून डागडुजी होत नसल्याने या इमारतींची अत्यंत जीर्ण अवस्था झाली आहे. इमारतींचे ठीकठिकाणचे स्लॅब पडले असून इमारतीवर झाडे उगवली आहेत तर अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. इमारत धोकादायक असल्याने म्हाडाने रहिवाशांना धारावी संक्रमण शिबिरात हलविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रहिवाशांनीही सध्या राहत असलेल्या संक्रमण शिबिरातून बाहेर न पडण्याची ताठर भूमिका घेतल्याने या कुटुंबीयांचे पुनर्वसन रखडल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.