Join us  

७0 टक्के मुंबईकरांना दंतविकाराने ग्रासले

By admin | Published: March 20, 2015 12:25 AM

जंक फूड अति प्रमाणात खाल्ले जाते. अशी खाद्यसंस्कृती आत्मसात केली असली तरीही त्याप्रमाणात मौखिक स्वच्छता केली जात नाही. यामुळे दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई : शहरी भागातील ६० ते ७० टक्के लोकांचे दात हे किडलेले असतात. तर ग्रामीण भागातील ६० ते ७० टक्के लोकांना हिरड्यांचे आजार असतात. शहरी भागात गोड पदार्थ, अति शिजलेले पदार्थ, जंक फूड अति प्रमाणात खाल्ले जाते. अशी खाद्यसंस्कृती आत्मसात केली असली तरीही त्याप्रमाणात मौखिक स्वच्छता केली जात नाही. यामुळे दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढले आहे. तर ग्रामीण भागात दातांना मशेरी लावणे अशा प्रकारांमुळे त्यांना हिरड्यांचे आजार जास्त प्रमाणात होतात. दातांना कीड लागणे, हिरड्यांचे आजार या दोघांच्या बरोबरीनेच मुखाच्या कर्करोगाचे प्रमाणदेखील गेल्या काही वर्षांत वाढताना दिसते आहे. याचे मुख्य कारण गुटखा, तंबाखूचे सेवन आहे. ९० टक्के मुखाचा कर्करोग हा याच कारणाने होतो. गेल्या १० वर्षांत आरोग्यविषयक जनजागृतीच्या बरोबरीनेच दंत आरोग्याविषयी जनजागृती होताना दिसत आहे. परंतु, अजूनही म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. यामुळे मुखाच्या आजारांमध्ये अजूनही काही आजार उद्भवताना दिसत आहेत. शहरी भागातील लोकांची जीवनशैली ही अत्यंत धकाधकीची आणि तणावपूर्ण आहे. याचा परिणाम आरोग्याच्या बरोबरीनेच दातांवरही होतो. दातांची झीज होते. याचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे. याचबरोबरीने चहा, कॉफीच्या अतिसेवनामुळे दातांचा रंग बदलतो. पांढरेपणा कमी झाल्याच्या तक्रारी गेल्या चार-पाच वर्षांत यायला लागल्या असल्याचे मत दंत शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अत्यंत सोपे उपाय आहेत. पहिला म्हणजे काहीही खाल्यानंतर चूळ भरली पाहिजे. दिवसातून दोनदा दात घासावेत. अति थंड किंवा गरम पदार्थ पटकन खाऊ नयेत. तोंडामध्ये छोटी जखम अथवा कोणताही त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.