मुंबईतील ७० टक्के पुरातन वास्तू गायब
By Admin | Published: April 7, 2015 05:21 AM2015-04-07T05:21:56+5:302015-04-07T05:21:56+5:30
विकास आराखड्यात धार्मिक स्थळांवर संक्रांत आल्याचे उजेडात आल्यानंतर आणखी एक धक्कादायक घोळ उघड झाला आहे. शहराची पुरातन व ऐतिहासिक
शेफाली परब-पंडित, मुंबई
विकास आराखड्यात धार्मिक स्थळांवर संक्रांत आल्याचे उजेडात आल्यानंतर आणखी एक धक्कादायक घोळ उघड झाला आहे. शहराची पुरातन व ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या जवळपास ७० टक्के वास्तू नवीन आराखड्यातून गायब करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स आॅफ वेल्स), ओव्हल मैदान, एशियाटिक ग्रंथालय, जनरल पोस्ट आॅफिस अशा प्रथम श्रेणीच्या वास्तूंचे अस्तित्वच एकप्रकारे नाकारण्यात आले आहे.
१९९५ मध्ये विकास नियंत्रण नियमावलीच्या कलम ६७ अंतर्गत पुरातन वास्तूंना संरक्षण देणारे मुंबई हे पहिले शहर ठरले होते. गेल्या दोन दशकांमध्ये अशा १५७७ पुरातन वास्तूंपैकी सुमारे एक हजार पुरातन वास्तूंची नोंद सन २०१४-२०३४ च्या विकास आराखड्यात घेण्यात आलेली नाही. २०१२ मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या पुरातन वास्तूच्या यादीला पूर्णपणे वगळण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत अतिक्रमणापासून मुक्त असलेल्या या वास्तूंची सुरक्षितताच धोक्यात आली आहे.
२०१२ मध्ये प्रस्तावित ९५० पुरातन वास्तू व परिसरांची यादी अद्याप प्रकाशित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या यादींमधील वास्तूंची नोंद घेण्यात काही अर्थ नाही, असा युक्तिवाद पालिकेच्या पुरातन वास्तू विभागातून मांडण्यात येत आहे. १९९५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या पुरातन वास्तूंपैकी ६० टक्के वास्तूंनाच विकास आराखड्यात स्थान मिळाले आहे. यावर मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीने आश्चर्य व्यक्त करीत ए विभागातील २७७ पैकी ८० पुरातन वास्तू गायब असल्याचे निदर्शनास आणले आहे.